सिंधुदुर्गात रोजगारनिर्मिती अभियान ; २१ व २२ ऑक्टोबरला १६ केंद्रांचे उद्घाटन

महिला व शेतकऱ्यांना शिवणकाम प्रशिक्षणासह उत्पन्नाची संधी
डॉ. सुनीता मोडक यांचे मार्गदर्शन
महिला आणि शेतकरी वर्गाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगारनिर्मिती अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ व २२ ऑक्टोबर रोजी १६ केंद्रांचा उद्घाटन सोहळा आणि मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कल्याणी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापक-अध्यक्षा डॉ. सुनीता मोडक (नाशिक) यांचे यावेळी मार्गदर्शन लाभणार आहे.
भारत सरकारप्रणित महिला उद्योजकता विकास अभियान, सेवाभावी संस्था प्रबोधन समिती, संजीवन उद्योग समूह आणि आश्रय प्रतिष्ठान, एमआयडीसी कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कुडाळ, मालवण, बांदा, किल्ले निवती, पाट, वालावल, हुमरमळा आदी ठिकाणी या अभियानांतर्गत केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.
या अभियानात महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण, कच्चा माल उपलब्ध करून देणे, तयार माल योग्य दराने स्वीकारणे, नियमित काम आणि उत्पन्नाची संधी उपलब्ध करणे, तसेच कर्ज, अनुदान (सब्सिडी) आणि परतफेडीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.
सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत विविध केंद्रांवर कार्यक्रम होणार आहेत. महिला आणि शेतकरी वर्गासाठी रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणाऱ्या या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आश्रय प्रतिष्ठानचे ज्येष्ठ उद्योजक माधव गोरे, मणिकर्णिकाच्या उद्योजिका उन्मेषा दाभोलकर आणि सतीश पाथरुड यांनी केले आहे.






