न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा येथील विद्यार्थ्यांचे श्रमदान; ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत बांधला वनराई बंधारा

वाढत्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्याच्या उद्देशाने न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा, ग्रामपंचायत चिंदर आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत वनराई बंधारा उभारणीचा स्तुत्य उपक्रम दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी चिंदर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
पर्यावरण रक्षण व जलसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या या अभियानात महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्थानिक ओढ्यावर दगड आणि मातीने भरलेल्या पोत्यांचा अत्यंत नियोजनबद्ध वापर करून हा वनराई बंधारा बांधण्यात आला. यामुळे परिसरातील पाणी अडवून ते जमिनीत मुरण्यास मोठी मदत होणार आहे.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती:
या उपक्रमात मुख्याध्यापक श्री. अंकुश घुटुकडे, प्रभारी उपशिक्षणाधिकारी श्री. संजय माने, पंचायत समिती सदस्य श्री. दीपक सुर्वे, ग्रामपंचायत अधिकारी श्री. भगवान जाधव, जिल्हा बँक अधिकारी श्री. मेस्त्री, ग्रामपंचायत कर्मचारी श्री. रणजीत दत्तदास, श्री. विश्राम माळगावकर, श्री. तुषार पवार, श्री. राज पालकर, चिंदरचे पोलीस पाटील तसेच शिक्षक श्री. संदीप रावले, डॉ. दत्तात्रय जाधव, श्री. महेंद्र पारिपत्ये, श्री. सखाराम राजम, श्री. निलेश राठोड, श्री. प्रकाश शेलार आणि शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. केदार शिर्के यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून श्रमदानात सहभाग घेतला.
श्री. संतोष गावकर यांनी विद्यार्थी व शिक्षकांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था केली होती. त्याचा आस्वाद सर्वांनी निसर्गाच्या सानिध्यात घेतला.
विद्यार्थ्यांमध्ये श्रमदानाची सवय रुजावी, सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी आणि पाण्याचे महत्त्व कळावे या हेतूने या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या या प्रत्यक्ष योगदानाबद्दल आणि शाळेच्या सामाजिक बांधिलकीबद्दल आचरा परिसरातील ग्रामस्थांकडून सर्वत्र कौतुक होत आहे.






