कणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या श्रमदानातून हुंबरट येथे वनराई बंधारा

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश

जलसंधारणासाठी सामाजिक बांधिलकीतून पुढाकार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पावसाचे पाणी अडवून त्याचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने कणकवली तालुका पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने हुंबरट येथे श्रमदानातून वनराई बंधारा उभारण्यात आला. जिल्हा प्रशासनाच्या जलसंधारण मोहिमेला प्रतिसाद देत दोन्ही संस्थांनी हा उपक्रम राबविला. यावेळी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ आणि ‘पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरा’ अशा घोषणा देत जलसंधारणाचा संदेश देण्यात आला.
दोन्ही संस्थांनी यापूर्वीही विविध ठिकाणी लोकसहभागातून वनराई बंधारे उभारून जलसंधारणाच्या कार्यात योगदान दिले आहे. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक उमेश वायंगणकर, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, उपाध्यक्ष उमेश बुचडे, खजिनदार रोशन तांबे, तुषार हजारे, विराज गोसावी, शशिकांत सातवशे, राजू दळवी, संजय बाणे, योगेश गोडवे, पंढरीनाथ गुरव, आर्ट ऑफ लिव्हिंगवंगे ॲड. राखी मालवणकर, नंदकिशोर आरोलकर, शंकर धुरी, मनोज राणे, राजश्री अंधारी, मयुरी चव्हाण, सुप्रिया काणेकर, सोनल मसुरकर, अजय मांडेकर, सुनील बाणे, प्रभाकर बाणे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले.

प्रत्येकाने जलसंधारणासाठी पुढाकार घ्यावा – भगवान लोके

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याचे महत्त्व ओळखून प्रत्यक्ष कृतीतून जलसंधारणाचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत समाजातील प्रत्येक घटकाने पाणी अडविणे, पाण्याचा अपव्यय टाळणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांनी सांगितले.

वनराई बंधारे भूजलपातळी वाढविण्यास पूरक – उमेश वायंगणकर

वनराई बंधाऱ्यांमुळे वाहून जाणारे पाणी अडविण्यास मदत होते. परिणामी परिसरातील ओढे-नाले आणि जलस्रोतांमध्ये पाणी टिकून राहण्यासह भूजलपातळी वाढविण्यासही अशा उपक्रमांचा फायदा होतो, असे आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक उमेश वायंगणकर यांनी सांगितले. पत्रकार आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सदस्यांच्या सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

पाणी बचतीसाठी महिलांनीही दक्षता घ्यावी – ॲड. राखी मालवणकर

दुष्काळाचे सावट लक्षात घेता महिलांनी दैनंदिन जीवनात पाणी वापरताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कपडे आणि भांडी धुण्यासाठी पाण्याचा वापर करताना काटकसर करावी. पाणी वाचविण्यासाठी प्रत्येकाने आतापासूनच पुढाकार घ्यावा, असे आवाहन ॲड. राखी मालवणकर यांनी केले.

error: Content is protected !!