कणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधारा

पाणी अडवा , पाणी जिरवाची घोषणाबाजी ; हुंबरट येथे जलसंधारणासाठी दोन्ही संस्थांचा पुढाकार

सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि पावसाचे पाणी अडवून त्याचा भविष्यात उपयोग व्हावा, या उद्देशाने कणकवली तालुका पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने हुंबरट येथे श्रमदानातून वनराई बंधारा उभारण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने सामाजिक संस्था, संघटना आणि नागरिकांना जलसंधारणाच्या कामात सहभागी होण्याचे केलेले आवाहन लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला.पाणी अडवा, पाणी जिरवा आणि पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरा, हा संदेश घोषणाबाजी करुन देण्यात आला.

कणकवली तालुका पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, सिंधुदुर्ग या दोन्ही संस्था सामाजिक बांधिलकी जपत हुंबरट येथे श्रमदानातून शुक्रवारी हा वनराई बंधारा बांधला. यापूर्वीही या संस्थांनी विविध ठिकाणी लोकसहभागातून वनराई बंधारे उभारून जलसंधारणाच्या कार्यात योगदान दिले आहे.यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक उमेश वायंगणकर, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके , उपाध्यक्ष उमेश बुचडे, खजिनदार रोशन तांबे, तुषार हजारे , विराज गोसावी , शशिकांत सातवशे , राजु दळवी , संजय बाणे ,योगेश गोडवे, पंढरीनाथ गुरव , आर्ट ऑफ लिव्हिंगचे ॲड. राखी मालवणकर, नंदकिशोर आरोलकर, शंकर धुरी, मनोज राणे , राजश्री अंधारी , मयुरी चव्हाण, सुप्रिया काणेकर, सोनल मसुरकर, अजय मांडेकर, सुनील बाणे, प्रभाकर बाणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
भगवान लोके म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता असताना पाण्याचे महत्त्व ओळखून प्रत्यक्ष कृतीतून जलसंधारणाचा संदेश देण्याचा प्रयत्न कणकवली तालुका पत्रकार संघ व आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारा तर्फे या उपक्रमातून करण्यात आला आहे. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देवून समाजातील प्रत्येक घटकाने पाणी अडविणे, पाण्याचा अपव्यय टाळणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे आवश्यक आहे, हा संदेश या श्रमदानातून आम्ही सर्वांनी दिला आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे उमेश वायंगणकर म्हणाले, वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून वाहून जाणारे पाणी अडविण्यास मदत होते. त्यामुळे वनराई बंधा-यांमुळे परिसरातील ओढे-नाले आणि जलस्रोतांमध्ये पाणी टिकून राहण्यास मदत होते. भूजलपातळी वाढविण्यासाठीही अशा प्रकारचे उपक्रम पूरक आहेत. पत्रकार व आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सदस्यांमुळे हा उपक्रम यशस्वी झाला आहे.
ॲड. राखी मालवणकर म्हणाल्या, दुष्काळाचे सावट समोर आहे त्यामुळे महिलांनी आपल्या रोजच्या जीवनात काळजी घेतली पाहिजे. विशेषत: कपडे , भांडी धुण्यासाठी पाणी वापरताना काळजी घेतली पाहिजे. आत्तापासून पाणी वाचवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेवून काम केलं पाहिजे.

error: Content is protected !!