काजू चोरी प्रकरणी काजू व्यापाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकारी आणि एसपींची भेट

गेल्या आठवडाभर जिल्ह्यात काजू चोरीच्या मालवण, बांदा व कुडाळ याठिकाणी ज्या घटना घडल्या आणि यामध्ये ज्या जिल्ह्यातील काही वर्ष अतिशय प्रामाणिकपणे हा काजू उद्योग करणारे उद्योजक आहेत, त्यानी या काजू खरेदी केल्या म्हणून पोलीसांनी जणू काजू खरेदी करणारेच गुन्हेगार आहेत अशा प्रकारची भूमिका घेतल्याने जो या व्यापाऱ्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. या अनुषंगाने आज महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन व कुडाळ एम. आय डि. सी. इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले.
मालवण मधील प्रथितयश काजू उद्योजक सुरेश नेरूरकर जे गेल्या पंचवीस वर्षाहून जास्त काळ या काजू उद्योगात असून या उद्योगाला जे. जी.आय. नामांकन मिळालेले आहे, यात त्यांचे फार मोठे योगदान आहे. देशाचे तत्कालीन कृषीमंञी शरद पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आलेला असून काजू प्रक्रिया उद्योगातील ते एक यशस्वी व प्रतिष्ठित उद्योजक आहेत. असे असुनही त्याना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून जी अपमानास्पद वागणूक दिली याबाबत या दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली. अशा पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे.
तसेच या घटनेमुळे या जिल्ह्यातील छोट्या मोठ्या काजू व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण असून याबाबत पोलीस प्रशासनाने आश्वासक वातावरण निर्माण करावे अशी विनंती या प्रसंगी करण्यात आली.
यावेळी झालेल्या चर्चेत महाराष्ट्र काजू असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, सचिव, बिपिन वरसकर, कुडाळ MIDC असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, सचिव नाकुल पार्सेकर, सहसचिव कुणाल वरसकर, गणेश काजूचे मालक सुरेश नेरुरकर, अभिषेक नेरुरकर, रामगड सरपंच शुभम माठकर, तेली समाजाचे माजी अध्यक्ष एकनाथ तेली, तसेच जि. प. सदस्य अनिल कांदळकर व प्रमोद भोगटे, भाऊ राणे, उदय केसरकर, भाऊ वळंजू आणि इतर उपस्थित होते.





