कुडाळमध्ये ‘वाचनवाट’चे भव्य पुस्तक प्रदर्शन सुरू

सतीश लळीत आणि डॉ. सई लळीत यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन
१८ ऑक्टोबरपर्यंत विविध साहित्यिक उपक्रम
तळकोकणात वाचन संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने वाचनवाट ग्रंथदालनातर्फे आयोजित भव्य पुस्तक प्रदर्शनाला कुडाळमध्ये उत्साहात सुरुवात झाली. कुडाळ हायस्कूलजवळील मराठा समाज हॉल येथे आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन सतीश लळीत आणि डॉ. सई लळीत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. पहिल्याच दिवशी वाचक, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आजच्या डिजिटल युगात मुलांना पुस्तकांशी जोडणे आणि त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी पालकांनी व विद्यार्थ्यांनी अशा पुस्तक प्रदर्शनांना आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन सतीश लळीत आणि डॉ. सई लळीत यांनी केले. या वेळी विवेक मुतालिक, संदीप मणेरीकर आणि ॲड. अंजली मुतालिक उपस्थित होते.
विविध साहित्यिक उपक्रमांची मेजवानी
तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात, १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ५ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कथाकथन आणि भाषिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून पुस्तक परिचय सत्र होणार आहे. यामध्ये डॉ. बाळकृष्ण लळीत हे ‘दक्षिण कोकणच्या आध्यात्मिक रहस्यांच्या शोधात — शोधयात्रेच्या निमित्ताने’, सचिन मणेरीकर हे ‘ओळख पुस्तकांची’ आणि मुग्धा शेवाळकर या ‘सफर बालसाहित्याच्या विश्वातली’ या विषयांवर संवाद साधणार आहेत. रविवार, १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता सचिन मणेरीकर निवडक कथांचे अभिवाचन करणार आहेत.
तळकोकणातील पुस्तकप्रेमी, वाचक, शाळा आणि महाविद्यालयांनी या प्रदर्शनाला भेट देऊन पुस्तकविश्वाचा आनंद घ्यावा आणि वाचन चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक सचिन व मुग्धा मणेरीकर यांनी केले आहे.






