व्यसनाचा आग्रह करणारा मित्र नव्हे, करिअरच्या वाटेतील अडथळा !

बॅ. नाथ पै संस्थेत अमली पदार्थ आणि सायबर गुन्ह्यांबाबत विद्यार्थ्यांना पोलिसांचे मार्गदर्शन
“व्यसनापासून दूर राहण्याचा सर्वांत महत्त्वाचा मार्ग म्हणजे मोह टाळणे. व्यसनाचा आग्रह करणारा खरा मित्र असू शकत नाही. स्वतःचे करिअर घडवायचे असेल, तर व्यसनांपासून दूर राहून चुकीच्या संगतीपासून सावध राहा,” असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक सचिन अवताडे यांनी केले.
बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालय, बॅ. नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालय आणि कुडाळ पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमली पदार्थविरोधी व सायबर क्राईम जनजागृती अभियानांतर्गत बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
व्यसनांमुळे व्यक्तीच्या आरोग्यावर, कौटुंबिक जीवनावर आणि सामाजिक प्रतिष्ठेवर होणारे दुष्परिणाम स्पष्ट करत त्यांनी तरुणांनी अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. तसेच सोशल मीडियाचा वापर करताना सतर्क राहणे, अनोळखी व्यक्तींशी मैत्री न करणे आणि फेसबुक अथवा संदेशांद्वारे मिळणाऱ्या आमिषांना बळी न पडणे, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी ‘थांबा, विचार करा, पडताळणी करा आणि नंतर कृती करा’ हा मंत्र लक्षात ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. सायबर फसवणूक झाल्यास तातडीने पालकांशी संपर्क साधावा आणि आर्थिक सायबर गुन्ह्यांची तक्रार करण्यासाठी १९३० या हेल्पलाइन क्रमांकाचा वापर करावा, असे सांगत पोलिस सदैव सोबत असल्याचा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश वेंगुर्लेकर यांनीही फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या समाजमाध्यमांचा जपून वापर करण्याचा सल्ला दिला. फ्रॉड कॉल, बनावट संदेश आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून तयार केलेल्या आकर्षक चेहऱ्यांच्या मोहात फसू नका, असे त्यांनी सांगितले. पालकांनी मुलांशी नियमित संवाद साधून त्यांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवावे आणि त्यांना विश्वासात घेऊन योग्य मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी व पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना पोलिस अधिकाऱ्यांनी सविस्तर उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. अमली पदार्थमुक्त समाज घडविण्यासह सायबर गुन्ह्यांविरोधातील जनजागृती अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास बडवे आणि संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली. मंदार जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी महिला पोलीस विनया सावंत, प्राचार्य अरुण मर्गज, सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य चैताली बांदेकर, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य वैशाली ओटवणेकर, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रत्युषरंजन बिस्वाल, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.






