ग्राहक न्यायालयामध्ये ऑनलाइन सुनावणी उपस्थित राहण्याची मिळणार आता संधी

पक्षकारांच्या वेळेची बचत होणार
सुनावणीवेळी गैरहजेरीचे प्रकार देखील कमी होणार
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये विविध प्रकारच्या ग्राहक तक्रार अर्जाची आणि अंमलबजावणी अर्जाची सुनावणी घेतली जाते. जिल्हा आयोगाने दिनांक 23/09/2026 पासून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्रक्रियेद्वारे ऑनलाइन सुनावणीची सुविधा औपचारिकरित्या सुरु केली आहे. त्याबाबतची माहिती देणेकरिता आणि ऑनलाइन सुनावणीबाबत महत्त्वाच्या मुद्द्द्यांवर चर्चा करण्याकरिता जिल्हा आयोगातील अधिकारी, कर्मचारी आणि सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघ आणि तालुका वकील संघ यांची सभा जिल्हा आयोगामध्ये आयोजित करण्यात आली होती. ऑनलाइन सुनावणीची प्रक्रिया, त्याद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा आणि संभाव्य अडचणी अगर शंका याबाबत सदरील सभेमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. कोणत्याही प्रकरणातील पक्षकार आणि त्यांचे वकील यांना त्यांच्या प्रकरणातील नेमल्या तारखेस व्यक्तिशः सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा आयोगामध्ये उपस्थित राहणे शक्य नसल्यास ते आयोगाने दिलेल्या लिंकवरून आभासी पद्धतीने म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रकरणात हजेरी नोंदवू शकतात आणि ऑनलाइन सुनावणीद्वारे काम चालवू शकतील. या सुविधेमुळे पक्षकार आणि वकील यांच्या वेळ आणि खर्चामध्ये निश्चितच बचत होणार आहे. प्रकरणाच्या नेमल्या तारखेस गैरहजर राहिल्यामुळे होणारे संभाव्य आदेश आणि अडचणी देखील टाळता येणार आहेत. ऑनलाइन सुनावणीची लिंक प्रत्येक दिवशी केंद्रशासनाच्या e-jagriti या ऑनलाइन पोर्टलवर आणि आयोगामधील डेली बोर्डवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी सर्व पक्षकार आणि वकिलांनी सदर सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती इंदुमती मलुष्टे, सदस्य श्रीमती रसिका निकुंभ आणि श्री योगेश खाडिलकर यांनी केले आहे.






