अखिल शिक्षक संघटनेचा संवेदनशील पुढाकार; हरकुळातील कुटुंबाला मदतीचा हात

समाजातील इतर घटकांनीही मदतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन
हरकुळ (ता. कणकवली) येथील आई-वडिलांच्या दुर्दैवी निधनानंतर पोरक्या झालेल्या चार भावंडांच्या कुटुंबाला अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटना शाखा कणकवलीच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला. संघटनेच्या वतीने या कुटुंबाला ३५ हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
*या घटनेमुळे कुटुंबावर अचानक संकट कोसळले असून मुलांच्या शिक्षणाचा व दैनंदिन गरजांचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत अखिल शिक्षक संघटनेने पुढाकार घेत आर्थिक मदत करून कुटुंबाला आधार दिला.
*अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटना ही केवळ शिक्षकांच्या प्रश्नांपुरती मर्यादित न राहता समाजाप्रती असलेली आपली जबाबदारीही सातत्याने पार पाडत असून गरजू व अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना वेळोवेळी मदत करत आहे. त्याच सामाजिक जाणीवेचा प्रत्यय या उपक्रमातून पुन्हा एकदा आला.
*या मदतीमुळे संबंधित विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी तसेच दैनंदिन गरजांसाठी दिलासा मिळणार असून त्यांच्या भविष्यासाठी ही मदत उपयोगी ठरणार आहे.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वळवी, तालुकाध्यक्ष प्रभाकर पावसकर, तालुका सचिव सत्यवान केसरकर तसेच अखिल संघटनेचे बहुसंख्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याचा विश्वास व्यक्त करत समाजातील इतर घटकांनीही अशा गरजू कुटुंबांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन केले.





