मृत्यूस कारणीभूत ठरेल अशा गंभीर मारहाण प्रकरणी दोघांची निर्दोष मुक्तता

संशयीतांच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद

वैयक्तिक वादातून कासार्डे धुमाळवाडी येथील फिर्यादी सत्यवान गोविंद म्हस्के, पत्नी साक्षी म्हस्के व आई आनंदी म्हस्के यांना लोखंडी शिगांनी मृत्यू होईल अशाप्रकारे गंभीर मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच रविंद्र आत्माराम म्हस्के व उदय आत्माराम म्हस्के यांची येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी शुभमं लटूरिया यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.

आरोपी व फिर्यादी कासार्ड येथील रहिवासी असून घरे एकमेकालगत आहेत. में २०१८ मध्ये आरोपींच्या झाडाची फांदी फिर्यादींच्या इलेक्ट्रीक बायरवर पडली. त्यामुळे विद्युत प्रवाह खंडीत झाला होता. त्यावरून दोघांमध्ये वादविवाद झाले हाते. त्यानंतर ऑक्टोबर २०१८ मध्ये झालेल्या वादळात पुन्हा तसाच प्रकार घडल्याने त्याबाबत फिर्यादी व पत्नी यांनी आरोपीच्या घरी जाऊन त्यांना विचारणा केली असता तेथीलच लोखंडी शिगांनी दोन्ही आरोपींनी त्यांना मारहाण केली होती. त्या आरडाओरडीने फिर्यादीची आई आनंदी ही आली असता तीलाही मारहाण केली. याबाबत कासार्डे पोलीस दूरक्षेत्र येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. वैद्यकीय तपासणीत तिघांच्याही जखमा गंभीर असल्याने त्यांना कणकवली व ओरोस येथील हॉस्पिटलमध्ये उपचार करावे लागले होते. या मारहाणीत फिर्यादीच्या डोक्याला टाके पडले व फॅक्चर झाले होते. याबाबत आरोपींविरूद्ध भादंवि कलम ३२६, ३२४, ३२३, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनावणीत सहा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या जबाबातील तफावती, तपासातील त्रुटी आदीमुळे न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!