झारापमध्ये आत्मा अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद ; सेंद्रिय शेतीचा संदेश

सेंद्रिय शेती ही खर्चिक नसून किफायतशीर आणि पर्यावरणपूरक शेती पद्धत आहे. आंबा-काजू बागायतदारांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिल्यास शेतीचा खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होईल. तसेच भात शेतीतील तांदूळ उकडा तांदूळ करून विकल्यास शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकतो, असे मार्गदर्शन छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रसाद ओगले यांनी केले.
झाराप ग्रामपंचायत सभागृहात ‘आत्मा’ अंतर्गत आयोजित शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे, पंचायत समिती सदस्य सिताराम तेली, झाराप सरपंच सौ दक्षता मेस्त्री, उपसरपंच मंगेश गावकर, ग्रामपंचायत सदस्य आशपाक कुडाळकर, श्रीम तनया मांजरेकर, संजीवनी पेंडूरकर, अमृता हरमलकर, विशाखा गोडे, माजी सरपंच प्रभाकर मेस्त्री, ग्रामपंचायत अधिकारी सतीश साळगावकर, गंगाराम वेंगुर्लेकर, भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, मंडळ कृषी अधिकारी सौ गायत्री तेली, उपकृषी अधिकारी मंदार सरमळकर, सहाय्यक कृषि अधिकारी श्रीम जागृती शेटये, आत्मा समितीचे अध्यक्ष मंगेश प्रभू, आत्मा कमिटी सदस्य शंकर हरमलकर, मंडळ अधिकारी श्रीम उत्तरा जांभवडेकर, ग्राम महसूल अधिकारी सुषमा गायकवाड, पोलीस पाटील श्रीम शमिका हरमलकर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. ओगले म्हणाले की, आंबा, काजू, केळी, नारळ यांसारख्या फळझाडांसाठी शेणखत व पालापाचोळ्याचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. रासायनिक खते पूर्णपणे वाईट नसली तरी त्यांचा वापर मर्यादित प्रमाणात करावा. झाडांचे वय लक्षात घेऊन खतांचा योग्य डोस द्यावा तसेच लागवड करताना झाडांमध्ये योग्य अंतर ठेवणेही आवश्यक आहे.
जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, माकडांचा वाढता सुळसुळाट ही शेतीसमोरील गंभीर समस्या बनली आहे. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वन विभागाकडून नुकसानभरपाई दिली जात असली तरी ती अपुरी आहे. शासनाने पंचनाम्याच्या नियमांमध्ये बदल करून शेतकऱ्यांना अधिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी लोकप्रतिनिधी व संबंधित विभागांनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर म्हणाले की, आजची युवा पिढी शेतीकडे वळत आहे. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादन वाढून शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल. बदलत्या हवामानानुसार पीकपद्धतीत तसेच मानसिकतेत बदल करणे गरजेचे आहे.
उप कृषी अधिकारी मंदार सरमळकर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना शेतीविषयक सर्व माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाविस्तार’ हे मोबाईल अॅप सुरू करण्यात आले आहे. ‘शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अॅपद्वारे विविध योजनांची माहिती, शेतीविषयक मार्गदर्शन आणि तांत्रिक माहिती शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होणार आहे.
तसेच शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास ‘स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ अंतर्गत वारसांना ₹२ लाखांची मदत दिली जाते. मृत्यूपासून ३० दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी कार्यालयात किंवा महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा, अशी माहितीही त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जागृती शेटये सहायक कृषि अधिकारी यांनी केले, तर आभार मंडळ कृषी अधिकारी गायत्री तेली यांनी मानले.





