रेल्वे रूळ चोरी प्रकरणी पिंगुळीच्या सरपंचांचा जबाब नोंदवला

आर पी एफ चे निरीक्षक राजेश सुरवाडे यांची माहिती
रेल्वे रूळ कट कोणी केले याचा कसून तपास सुरू
कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील स्मशानभूमी मध्ये रेल्वेची रूळ स्मशान खोड्यासाठी वापरल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक व पिंगुळीतील ग्रामस्थांनी करत आर पी एफ च्या च्या निरीक्षकांना शिष्टमंडळाने घेराव घालत दोन दिवसापूर्वी जाब विचारला होता. या घटनेनंतर कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील फोनवरून माजी आमदार वैभव नाईक यांनी आंदोलनादरम्यान चर्चा करत कारवाईची मागणी केली होती. दरम्यान या प्रकरणी पिंगुळी चे सरपंच यांचा जबाब आर पी एफ अधिकाऱ्यांकडून घेण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वे पोलीस बलाचे निरीक्षक राजेश सुरवाडे यांनी दिली. दरम्यान या प्रकरणी अजून काही जणांचे जबाब नोंदवले जाण्याची शक्यता असून रेल्वे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र अद्याप याप्रकरणी अधिकची माहिती सांगण्यास सुरवाडे यांनी नकार दिला. कोकण रेल्वेचे रूळ चोरी करून ते स्मशानभूमीतील खोड्या साठी वापरल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. त्यानंतर ज्यावेळी या तक्रारी संदर्भात माहिती मिळाली त्यानंतर घटनास्थळी भेट दिली त्यावेळी त्या ठिकाणी सदर रेल्वेचे रूळ नव्हते अशी माहिती श्री सुरवाडे यांनी त्यावेळी दिली होती. परंतु जीपीएस लोकेशन असलेले फोटो सादर करत जर तेथे रूळ नव्हते तर जीपीएस लोकेशन ला स्मशानभूमीमध्ये रेल्वेचे रूळ कसे दिसतात? असा सवाल केला होता. याप्रकरणी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करताच चौकशी करण्याचे आदेश आर पी एफ ला दिले होते. याप्रकरणी कारवाई न केल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा देखील ठाकरे शिवसेनेने दिला होता. दरम्यान या प्रकरणात आरपीएफ कडून चौकशी सुरू करण्यात आली असून याची माहिती घेतली जात आहे. तसेच या प्रकरणी चौकशी सुरू असल्याने अधिक माहिती देता येणार नाही असेही श्री सुरवाडे यांनी सांगितले. या प्रकरणात रेल्वेचे रूळ कट करणाऱ्याची देखील चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
कणकवली प्रतिनिधी