एसटी कामगार सेनेचे उद्या कुडाळला महाराष्ट्रव्यापी अधिवेशन

सरचिटणीस हिरेन रेडकर यांची पत्रकार परिषदेत माहिती

माजी मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार उदघाटन

महाराष्ट एसटी कामगार सेनेचे महाराष्ट्रव्यापी अधिवेशन शनिवार दिनांक १४ मार्च २०२६ रोजी कुडाळ येथे होणार आहेत. यावेळी कामगारांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा होणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली. कुडाळ एमआयडीसी विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना हिरेन रेडकर यांनी सांगितले कि महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे हे नववे महाराष्ट्रव्यापी अधिवेशन आहे. कुडाळ एसटी डेपोच्या मैदानावर १४ मार्च रोजी सकाळी १० वाजता अधिवेशनाचे उदघाटन ज्येष्ठ शिवसेना नेते माजी मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, आमदार ऍड. अनिल परब, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, आमदार महेश सावंत, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत मान्यवर आदी उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी कामगार सेनेची मुंबई, सोलापूर, रत्नागिरी, अमरावती, पुणे याठिकाणी राज्यव्यापी अधिवेशने झाली आहेत. या अधिवेशनात कामगारांच्या हिताचे काही ठराव मांडले जातील. तसेच २०१८ पासून कामगारांची महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढ फरक अशी थकबाकी महामंडळाकडे आहे. यासाठी अनेकवेळा परिवहन मंत्र्यांसोबत बैठक घेतली आहे. पण त्यातून काही तोडगा निघाला नाही. त्याबाबत उद्याच्या अधिवेशनात काही विशेष ठराव मांडले जातील असे श्री. रेडकर यांनी सांगितले.
माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, सध्या सुमारे ८० हजार कामगार एसटी महामंडळात आहेत. त्यापैकी १५ हजार पेक्षा जास्त कामगार एसटी कामगार सेनेचे सदस्य आहेत. दिवाकर रावते ज्यावेळी परिवहन मंत्री होते त्यावेळी त्यांच्या माध्यमातून एसटी कामगारांबाबत अनेक चांगले निर्णय घेण्यात आले होते. नवीन एसटी गाड्या खरेदी, भाडेतत्वावर एसटी गाड्या घेणे, कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, स्थनिक भरती अशा अनेक गोष्टी त्यावेळी झाल्या होत्या. पण कोरोनाच्या काळात एसटी कामगार सेनेच्या माध्यमातून जी कामे झाली होती ती नंतर बंद झाली. त्यावेळी गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी एसटीचे शासकीय विलीनीकरण करावे यासाठी प्रयत्न केले होते. त्यासाठी आंदोलन सुद्धा झाले होते. परंतु विलीनीकरणाची मागणी आजही पूर्ण होऊ शकली नाही. याबाबत एसटी कामगार सेनेने सातत्याने आवाज उठविला आहे. खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली एसटी कामगार सेनेचे काम चांगल्याप्रकारे सुरु आहे. खासदार अरविंद सावंत या जिल्हयाचे सुपुत्र असल्याने त्यांच्या मागणीनुसार हे अधिवेशन सिंधुदुर्ग जिल्हयात होत आहे. या अधिवेशनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तीन ते साडेतीन हजार कामगार उपस्थित राहणार आहेत. एसटी कामगारांच्या प्रश्नांबाबत यावेळी चर्चा होईल. आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. त्यासाठी आम्ही या सर्व एसटी कामगारांचे स्वागत करतो. या एसटी कामगारांना जिथे जिथे गरज लागेल त्याठिकाणी शिवसेना म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत अशी ग्वाही माजी आमदार वैभव नाईक यांनी यावेळी दिली.
यावेळी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर, माजी आमदार वैभव नाईक, कामगार सेनेचे कार्याध्यक्ष प्रदीप धुरंधर, खजिनदार राजेंद्र मोजाड, सिंधुदुर्ग सचिव भगवान धुरी, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, ठाकरे सेना तालुकाप्रमुख राजन नाईक ऊपस्थित होते.

error: Content is protected !!