कमर्शियल गॅस सिलिंडरचा पुरवठा करा

कणकवली तालुका हॉटेल चालक – मालक संघटनेची मागणी

तहसीलदारांना दिले निवेदन

मध्यपूर्व आशिया, अमेरिका व युरोपियन खंडात सध्या निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम गॅस पुरवठ्यावर होत असून कणकवली शहरात कमर्शियल गॅस सिलिंडरची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. सिलिंडर उपलब्ध नसल्यामुळे हॉटेल, खानावळ, चहा स्टॉल, बेकरी आदी व्यवसायांवर गंभीर परिणाम झाला असून काही ठिकाणी व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कमर्शियल गॅस सिलिंडरचा पुरवठा तात्काळ सुरू करावा, अशी मागणी कणकवली तालुका हॉटेल चालक-मालक संघटनेने शासनाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन संघटनेच्या वतीने तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कणकवली नगरपंचायत हद्दीत अनेक हॉटेल, खानावळ, चहा स्टॉल, बेकरी तसेच लघुउद्योग हे कमर्शियल गॅस सिलिंडरवर अवलंबून आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून कमर्शियल गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद असल्याने अनेक व्यावसायिकांना सिलिंडर मिळत नाहीत. स्थानिक गॅस एजन्सीकडे विचारणा केली असता कंपनीकडून स्टॉक उपलब्ध होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून आर्थिक नुकसान होण्याबरोबरच अनेक कामगारांच्या रोजगारावरही परिणाम होत आहे.
गॅस सिलिंडर हा अत्यावश्यक वस्तूंमध्ये मोडत असल्याने त्याचा पुरवठा नियमित असणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित गॅस कंपनी व एजन्सींशी समन्वय साधून कमर्शियल गॅस सिलिंडरचा पुरवठा तातडीने सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
निवेदन देतेवेळी संघटनेचे अध्यक्ष संतोष काकडे, उपाध्यक्ष सुशील पारकर, खजिनदार सुजित काणेकर, शेखर गणपते, चंदन काणेक, बंडया पारकर, सुजित जाधव, देवेंद्र चिंदरकर, निलेश वाळके, अमित टकले, विशाल लोके, विलास कोरगावकर यांच्यासह संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
शहरातील हॉटेल व्यावसायिकांना कमर्शियल गॅस सिलिंडर पुरवठा करणाऱ्या एजन्सीकडे सिलिंडरचा स्टॉक उपलब्ध असूनही तो देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यावर तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी संबंधित एजन्सीधारकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता सध्या स्टॉक नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, हॉटेल व्यवसायासाठी परप्रांतातून आणलेल्या कामगारांना सिलिंडर अभावी स्वतःचे जेवण बनविणे शक्य होत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना जेवण बनविण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात घरगुती गॅस सिलिंडर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी संघटनेने केली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर बैठक बोलावण्यात येणार असून या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन तहसीलदार देशपांडे यांनी दिले.

error: Content is protected !!