कणकवली येथे शास्त्रीय संगीत धृपद–धमार गायन कार्यशाळा- पुणे येथील कलाकार करणार मार्गदर्शन

आदर्श संगीत विद्यालय कणकवली यांच्यावतीने रविवार दिनांक १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता शास्त्रीय संगीत धृपद–धमार गायनाच्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन
भारतीय शास्त्रीय संगीतातील प्राचीन आणि गंभीर मानली जाणारी धृपद–धमार गायन शैली याविषयीच्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना धृपद आणि धमार या शैलींची सखोल माहिती देण्यात येणार आहे. धृपद ही भारतीय शास्त्रीय संगीतातील सर्वात जुनी गायनपद्धती असून तिची परंपरा तानसेन आणि स्वामी हरिदास यांच्या काळापासून सुरू झाली. रागाची शुद्ध मांडणी, गंभीर आलाप आणि पखवाजाची साथ हे या शैलीचे वैशिष्ट्य आहे.
धमार ही धृपदाशी निगडित शैली असून ती प्रामुख्याने १४ मात्रांच्या धमार तालात गायली जाते. विशेषतः होळीच्या प्रसंगाशी संबंधित रचना या शैलीत आढळतात.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह नोम तोम आलाप, रागमांडणी, तालरचना, लयकारी यांचे विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे . शास्त्रीय संगीत गायनचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
आदर्श संगीत विद्यालय कणकवलीच्या वतीने शास्त्रीय संगीताची परंपरा जतन व संवर्धन करण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांचे नेहमीच आयोजन करण्यात येते.
पुणे येथील सौ.तनुजा पांडे या कार्यशाळेला मार्गदर्शन करणार असून त्या शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि धृपद गायन शैलीत अनेक वर्षे कार्यरत आहेत. बी ए आणि एम ए शास्त्रीय संगीतात केलेले असून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत अलंकार देखील आहेत. त्यांनी ख्याल संगीताचे शिक्षण गुरु अंजली मालकर आणि पंडित हेमंत पेंडसे यांच्याकडे घेतले आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून पंडित उदय भवाळकर यांच्याकडे प्राचीन अशा धृपद गायनाचे शिक्षण घेत आहेत.
वयाच्या तेराव्या आणि चौदाव्या वर्षी सलग दोन वर्षे शासनाची शिष्यवृत्ती आणि पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. त्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर संगीतातल्या वेगवेगळ्या शैलींचे शिबिर आणि सादरीकरण केले आहे.
पुणे येथील निवासस्थानी भारतातील आणि भारताबाहेरील विद्यार्थ्यांना गुरु शिष्य परंपरेत गुरुगृही राहून पारंपारिक पद्धतीने शिक्षण दिले जाते.
बालकलाकार ओवी पांडे हिचे विशेष सादरीकरण
ओवी हीने वयाच्या तिसऱ्या वर्षी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत शिक्षणाची सुरुवात तिची आई आणि गुरु सौ.तनुजा पांडे यांच्याकडे केली. वयाच्या सहाव्या वर्षी ओवीने ध्रुपद गायनाकडे अधिक कल दर्शविला,जी एक प्राचीन आणि दुर्मिळ कला आहे. ती ITC SRA (Sangeet Research Academy) कोलकाता ची Scholar आहे. ही अकादमी जगभरातील भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचारासाठी समर्पित आहे. पंडित अजय चक्रबर्ती, पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया, पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर आणि पंडित श्री उदय भवाळकर यांसारखे दिग्गज कलाकार त्याला प्रोत्साहन देत आहेत. ITC SRA येथे पं. श्री.उदय भवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ध्रुपद शिकत आहे. ती गुरू-शिष्य परंपरेत शिकत आहे.
ओवी ला भारत सरकारची 2025 सालची मानाची CCRT शिष्यवृत्ती आणि ITC SRA ची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. तिला 2021 मध्ये वीणा फाउंडेशन कडून रु.18000 ची शिष्यवृत्ती मिळाली. ती रोटरी क्लब, बंगलोर द्वारे आयोजित युवा यामिनी संगीत महोत्सवाची सातत्यपूर्ण कलाकार आहे.
संगीत अलंकार प्रणय सकपाळ यांची लाभणार पखवाज साथ
संपूर्ण कार्यशाळा व कुमारी ओवी पांडे व तनुजा पांडे यांच्या सादरीकरणासाठी पुणे येथील मृदुंगमहर्षी पं. माणिक मुंडे व तालमणी श्री. सुखद मुंडे यांचे शिष्य श्री. प्रणय सकपाळ यांची पखवाज साथ लाभली आहे. पखवाज या विषयात त्यांनी एम. ए. ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. तसेच, त्यांना CCRT स्कॉलरशिप व डी. व्ही. पलुस्कर पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
या कार्यशाळेला विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संचालिका सौ. तेजस्विता संदिप पेंडुरकर (९४२३३०२७७०) यांनी केले आहे…





