मालकावर ब्लेडने वार करून मारहाण केल्याप्रकरणी कामगारांना सशर्त जामिन मंजूर

आरोपीच्या वतीने ॲड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद
कणकवली तालुक्यातील फिर्यादी कल्लू रसपाल निसाद यांनी काम न केल्याबाबत जाब विचारल्याच्या रागातून कामगार आरोपी प्रेमचंद ननकू निसाद, संतराम जगमोहन निसाद, पवन निसाद यांनी फिर्यादीस शिवीगाळ करत मारहाण केली व त्यांच्या गालावर ब्लेडने वार करत दुखापत केल्याबाबत फिर्यादीने दिनांक ३० जुलै २०२५ रोजी दिलेल्या तक्रारीवरून कणकवली पोलिस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(३), 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार संशयित आरोपी प्रेमचंद ननकू निसाद, संतराम जगमोहन निसाद याना अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. जामीन अर्जावर युक्तिवाद झाल्यानंतर संशयित आरोपीस ५० हजारांचा सशर्त जामिन मंजूर करताना कणकवली येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. एस. जी. लटूरीया यांनी आरोपीने फिर्यादी अथवा साक्षीदारावर दबाव आणू नये, त्याना धमकावू नये, सरकारी पक्षाच्या पुराव्यात ढवळाढवळ करू नये, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या बुधवारी पोलिस स्टेशनला हजेरी लावावी, तपासकामात सहकार्य करावे आदी अटी घातल्या आहेत. संशयित आरोपीच्या वतीने ॲड. अक्षय चिंदरकर यांनी युक्तिवाद केला.
कणकवली प्रतिनिधी