फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण याची कणकवलीतून पायी दौड

मुंबई ते गोवा अंतर चार दिवसांत पूर्ण

एकात्मता आणि सुदृढ जीवनशैलीचा दिला संदेश

फिटनेस आयकॉन म्‍हणून ओळख असलेले अभिनेते मिलिंद सोमण याने ‘फिट इंडियन रन’ मोहिमेंतर्गत आज मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास केला. आपले हे धावणे केवळ फिटनेससाठी नाही, तर मानसिक लवचिकता, राष्ट्रीय एकात्मता आणि सुदृढ जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी असल्‍याचेही त्‍याने यावेळी स्पष्‍ट केले. यावेळी त्यांच्याशी ओसरगाव येथे सामाजिक कार्यकर्ते व गोपुरी आश्रमाचे विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांनी संवाद साधला.
श्री.सोमण यांनी २६ जून रोजी दादर येथील शिवाजी पार्क येथून फिट इंडिया रन ही मोहीम सुरू केली. यातील पहिल्‍या दिवशी त्यांनी २१ किलोमीटर धावणे आणि ९० किलोमिटर सायकल चालवली. तसेच कोलाड येथे मुक्‍काम केला. तर दुसऱ्या दिवशी चिपळूण पर्यंत १०० किलोमिटरचा दुसरा टप्पा पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी चिपळूण ते खारेपाटण पर्यंत सायकल आणि पायी दौड केले. तेथील मुक्‍कामानंतर त्यांनी गोव्याच्या दिशेने प्रयाण केले. यात नांदगाव ते कणकवली पर्यंतचे अंतर सायकल वरून पूर्ण केले. तर कणकवली या टप्प्यात पायी दौड केली. यावेळी सोमण याच्याशी विविध सामाजिक कार्यकर्ते, चाहत्‍यांनी संवाद साधला.
यावेळी श्री. साेमण म्‍हणाला की, कोकणातील हिरवळ, वळणदार रस्ते, निसर्गरम्य दृश्ये आणि पावसाळी हवामान या प्रवासाला एक वेगळीच उर्जा देत आहेत. कोकणातून जाणारा प्रत्येक किलोमीटर निसर्ग आणि चैतन्याचा उत्सव असल्यासारखा वाटतो असे ते म्‍हणाले. या मोहिमेत त्यांची पत्‍नी अंकिता कोंवर आणि अन्य टीम सहभागी झाली आहे. कणकवली हून सोमवारी रात्रीपर्यंत ते गोव्याला पोहोचणार होते.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!