महायुतीच्या माध्यमातून बिनविरोध यश मिळवणारा सिंधुदुर्ग राज्यात एकमेव – एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कुडाळ मध्ये महायुतीची प्रचार सभा

निवडणूक होण्यापूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचे २५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत जिल्ह्यात १०० टक्के निश्चितच यश मिळेल असा विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.महायुतीच्या माध्यमातून बिनविरोध यश मिळवणारा सिंधुदुर्ग राज्यात एकमेवजिल्हा असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ येथे आज सायंकाळी उशिरा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा झाली. त्यावेळी ते उपस्थितांना संबोधित करत होते. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच बजेट २० कोटीवरून १०० कोटींवर नेलं जाईल अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुतीची प्रचार सभा आज कुडाळ हायस्कुलच्या मैदानावर झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी या प्रचार सभेस संबोधित केले. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, आमदार रवींद्र फाटक, दत्ता सामंत, प्रभाकर सावंत, मनीष दळवी, संध्या तेरसे, श्वेता कोरगावकर, संजू परब, दत्ता दळवी, संजय आंग्रे, प्रमोद जठार, प्राजक्ता बांदेकर आदी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे, अजितदादा पवार यांच्या प्रतिमांना वंदन करून सभेला सुरुवात झाली.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, या जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकांसाठी महायुती झाली आहे. खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली हि निवडणूक लढली जात आहे. नितेश राणे यांच्या करिष्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे २५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. पुढे सुद्धा जिल्ह्यात महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास श्री. शिंदे यांनी व्यक्त केला. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. या निवडणुकीत महायुतीला भरघोस यास मिळेल आणि येथे विरोधकांची डाळ शिजणार नाही. निलेश आणि नितेश येथे एकत्र आहेत. त्यामुळे विजय निश्चित आहे असे श्री. शिंदे यांनी सांगितले. येथील तरुण-तरुणींना रोजगारासाठी मुंबईत जावे लागू नये असे काम करा असा सल्ला त्यांनी उमेदवारांना दिला. जिल्हा परिषदेचे बजेट २० कोटी वरून १०० कोटीपर्यंत नेणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. बजेट मध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोकणसाठी भरभरून दिले असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, एमआयडीसी मार्फत उद्योगाला पूरक अशी स्किल सेंटर आम्ही अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर येथे उभारली आहेत. त्याच धर्तीवर सिंधुदुर्गाच्या उद्योगाला चालना देण्यासाठी येथे देखील अशी स्किल सेंटर उभारली जातील. शेवटी सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे आणि पर्यटनावर जर आपल्याला उद्योग आणायचे असतील तर त्या बाबतीमध्ये देखील ट्रेनिंग आपल्या इथल्या मुला मुलांना मुलींना द्यावे लागेल आणि त्यासाठी तो देखील उपक्रम आपण नक्कीच सिंधुदुर्गमध्ये राबवू अशी ग्वाही श्री. सामंत यांनी दिली.
पालकमंत्री नितेश राणे यांनी देखील उपस्थितांना संबोधित करताना माजी उबाठा आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. कमळ आणि धनुष्यबाण या चिन्हावर निवडून येतील त्यांनाच निधी मिळेल याचा त्यांनी पुनरुच्चार केला. याला कारण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना जो सापत्नभाव दाखवला हेच असल्याचे ते म्हणाले. जेव्हा ९ फेब्रुवारीला निवडणुकांचे निकाल लागतील तेव्हा सिंधुदुर्गातील सर्वच्या सर्व जागा महायुतीने जिंकलेल्या असतील असा पहिला फोन सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तुम्हाला येईल असे त्यांनी एकनाथ शिंदे याना सांगितले. या जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापर्यंत, शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचवण्याचा मानस आमच्या सगळ्यांचा असल्याचे पालकमंत्री शेवटी म्हणाले.
आमदार निलेश राणे यांनी जोशपूर्ण भाषण करून उपस्थिताना महायुतीला आशीर्वाद देण्याची विनंती केली. विरोधकानावर जोरदार टीका करताना आमदार निलेश राणे म्हणाले, विरोधकांकडे तुमच्याकडे द्यायला काय नाही. तुम्हाला सांगायला काय नाही. ते फक्त राणेंवर टीका करू शकतात, त्याच्या पलीकडे तुम्हाला देऊ काही शकत नाहीत. ते आमच्यावर टीका करतील तोपर्यंत चालेल, पण या जिल्ह्याचे नुकसान व्हायला आम्ही देणार नाही हा आत्मविश्वास घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत. महायुतीचे निवडणून येणारे उमेदवार, उद्याचे सदस्य जातील ते जनतेचे सेवक म्हणून जातील मालक म्हणून जाणार नाहीत. विरोधक फक्त लूटमार करण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार दीपक केसरकर यांनी महायुती सरकारने केलेलया विकासाबाबत भाष्य केले. या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने चांगले उमेदवा देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी दत्ता सामंत, संजू परब, काका कुडाळकर, दीपलक्ष्मी पडते, संध्या तेरसे, दीपक नारकर, अरविंद करलकर यांनी सभेला संबोधित केले. सूत्रसंचालन दादा सैल यांनी केले. सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार याना श्रद्धांजली वाहण्यात आली. या प्रचारसभेला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!