सर्वच्या सर्व जागा जिंकून महायुती इतिहास घडवेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांना विश्वास
गावा गावांमधील विकास कामे महायुतीला विजयापर्यंत पोहोचवणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून आम्ही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांना सामोरे जात आहोत. भाजप ,शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची युती खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 50 जिल्हा परिषद व 100 पंचायत समिती जिंकून एक नवा इतिहास घडवेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्यासोबतच आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ,आम. निलेश राणे ,आम. दीपक केसरकर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आम्ही लढवत आहोत. महायुतीच्या माध्यमातून गावागावात काम करत असताना केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून झालेली विकासकामे, विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांना आलेले यश हेच या निवडणुकीतील आमच्या यशाचे गमक असणार आहे.
या निवडणुकीच्या माध्यमातून विशेषता कणकवली विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त जागा बिनविरोध काढण्यात यश आले आहे .या मतदारसंघातील 18 पैकी 7 जिल्हा परिषद व 36 पैकी 13 पंचायत समितीच्या जागा बिनविरोध येण्यात यश मिळाले आहे. उर्वरित जागांमध्ये विरोधकांना उमेदवारी मिळू शकलेले नाहीत अशी स्थिती आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करताना तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान खास. नारायण राणे यांच्या सोबतच विद्यमान पालकमंत्री नितेश राणे यांनी विकासाचा हा चढता आलेख कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज गावोगावी रस्ते, पाणी, वीज हे प्रश्न मार्गी लागलेले आहेत. प्रत्येक गावातच नव्हे तर वाडीवर रस्त्यांचे जाळे विस्तारलेले आहे. अनेक ठिकाणी बीएसएनएलचे टॉवर उभे राहिले आहेत ,जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावागावांमध्ये कोट्यावधी रुपयाच्या पाणीपुरवठ्याच्या योजना यशस्वी होत आहेत. साहजिकच सिंधुदुर्ग जिल्हा टँकर मुक्त करण्यात यश आलेले आहे. लाडकी बहीण योजना ,प्रधानमंत्री किसान सन्मान योजना तसेच पंतप्रधान घरकुल योजना अशांसारख्या अनेक योजना तळागाळातील लोकांना लाभदायी ठरले आहेत. गावातील सर्वसामान्य कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने ही योजना यशस्वी ठरताना दिसत आहेत. या साऱ्याचा परिपाक म्हणूनच या निवडणुकीत महायुतीच्या कार्यकर्त्यांना प्रत्येक गावात वाढता पाठिंबा मिळत आहे. या पाठिंबाच्या जोरावरच सिंधुदुर्ग मधील सर्वच्या सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती जागा महायुती जिंकेल असा विश्वास मी व्यक्त करतो असेही अबिद नाईक म्हणाले.
आज केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार आहे अशा स्थितीत जिल्हा परिषद माहितीच्या ताब्यात असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तरच विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी येऊन गावांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो आणि याची पूर्णतः जाणीव सिंधुदुर्गमधील जनतेला आहे. म्हणूनच जिल्ह्यातील जनता महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे असून खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली व पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या निवडणुकीत जिल्ह्यातील जनता महायुतीच्या पाठीशी 100% उभी आहे असा विश्वासही श्री.नाईक यांनी व्यक्त केला.





