कलाकाराच्या करिअरची सुरुवात ब्रम्हांडनायकाच्या भूमिकेने ही सर्वात मोठी गोष्ट – अभिनेते अक्षय मुडावदकर

मालिकेच्या सुरुवातीनंतर माझ्या स्वभावातील अनेक गोष्टी बदलल्याचे मुडावदकर यांचे प्रतिपादन

अचानक एक फोन येतो आणि मला स्वामींची भूमिका तुम्ही कराल काय? असं विचारलं जातं ! स्वामी महाराजांची भूमिका सकारायला मिळते आहे हीच सगळ्यात मोठी मला आलेली स्वामींची प्रचिती आहे. एका कलाकाराच्या करियरची सुरवात ब्रम्हांडनायक यांच्या भूमिकेने होते ही सर्वात मोठी गोष्ट आहे. असे प्रतिपादन कलर्स मराठी फेम श्री स्वामी समर्थ मालिकेतील स्वामींची भूमिका साकारलेले कलावंत अक्षय मुडावदकर यांनी केली.
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ येथे आयोजित स्वामी प्रकट दिन व हडपीड मठाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त पुणे जेजुरी गड कडेपठारावरील खंडोबा मल्हारी मार्तंड यांच्या देखाव्याच्या उद्घाटनासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी उपस्थित स्वामीभक्तांशी साधलेल्या संवादा दरम्यान बोलत होते.ते पुढे म्हणाले की ,कोकणात मी पहिल्यांदा आलो आहे. मी एक कलाकार आहे त्यामुळे मला नमस्कार करू नका. फक्त स्वामींना नमस्कार करा. कलाकारांवर प्रेम करा. गेली चार वर्ष खूप प्रेम या मालिकेवर सर्वांनी केले. लवकरच पंधराशे भाग पूर्ण होणार आहेत. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप अनमोल असतात. या चार वर्षात खूप शिकायला मिळालं. स्वामी नव्याने समजतायत. स्वामी ही अनुभवण्याची गोष्ट आहे. या मालिकेद्वारे पाच सहा वर्षाच्या मुलांना सुद्धा स्वामींच्या सेवेची ओढ लागल्याचे पाहता येत आहे.प्रत्यक्ष सेट वरील अनेक अनुभव यावेळी त्यांनी कथन केले . स्वामींच्या लीला पोचविण्यासाठी आम्ही एक माध्यम आहोत. प्रायोगिक व व्यावसाईक नाटकात मी भूमिका केल्या.पण या मालिकेची सुरवात झाल्यानंतर माझ्या स्वभावात खूप गोष्टी बदलल्या आहेत.

  प्रेक्षकांचे प्रेम स्वामींच्या भूमिकेमुळे मिळत आहे. त्यांची भूमिका मला साकारायला मिळाली हे मोठे भाग्य आहे. हडपिड येथे अतिशय सुबक आणि स्वामींचा देखणा मठ स्वामी भक्तांच्या सेवेत आहे. अतिशय शांत वातावरणात हा मठ आहे. त्यामुळे याठिकाणी पुन्हा यायला नक्की आवडेल असेही अभिनेते अक्षय मुडावदकर म्हणाले. 
              अभिनेते अक्षय मुडावदकर व सौ मुडावदकर यांचा  जेजुरी गड कडेपटारावरील ट्रस्टचे विश्वस्त यांचाही स्वामींची प्रतिमा देऊन मठाचे अध्यक्ष प्रभाकर राणे,सचिव नंदकुमार पेडणेकर, सौ नीलम पेडणेकर, यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
 यावेळी अनेक भक्तांनी त्यांच्या सोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती. तसेच स्वामींची भूमिका साकारणारे कलावंत प्रत्यक्ष पाहण्याची संधी स्वामीरत्न नंदकुमार पेडणेकर यांच्यामुळे मिळाल्याची भावना अनेक भक्तांनी यावेळी व्यक्त केली. अभिनेते श्री अक्षय मुडावदकर यांच्या उपस्थितीने हजारो भाविक भारावून गेले होते.सर्व धार्मिक विधीसह सर्व कार्यक्रम उत्साहात भक्तीमय वातावरणात हजारो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत पार पाडले.
error: Content is protected !!