कृत्रिम बुद्धिमत्तेवर दळवी महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद यशस्वी;

शोधनिबंध सादरीकरणात रेहान नुरले प्रथम
‘विश्वनाथ समिट’ मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातील बदलांवर राष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांचे मंथन
मुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात, “कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने विज्ञान, वाणिज्य, व्यवस्थापन आणि माध्यम क्षेत्रातील नव्याने उदयास येणाऱ्या जागतिक प्रवृत्तींचे विश्लेषण” या एक दिवसीय आभासी राष्ट्रीय परिषदेचे 29 मार्च रोजी उत्साहात आयोजन करण्यात आले. या महत्त्वपूर्ण विषयावर देशभरातील तज्ज्ञांसह मान्यवरांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मा. श्रीपाद वेलिंग, प्रभारी संचालक, सिंधुदुर्ग परिसर व समन्वयक, दळवी महाविद्यालय आणि डॉ. हिरेन दंड, विभाग प्रमुख, माहिती व तंत्रज्ञान विभाग, मुलुंड महाविद्यालय, मुंबई
डॉ. दीपक रावेरकर, समन्वयक, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श महाविद्यालय, अंबाडवे, ता.मंडणगड जि. रत्नागिरी उपस्थित होते. महाराष्ट्र खनिज विकास महामंडळ लि. यांच्या प्रायोजकत्वाखाली ही ज्ञानवर्धक परिषद यशस्वीरित्या पार पडली.
दळवी महाविद्यालयात मागील पाच वर्षांपासून परिषदेचे आयोजन केले जाते. कोरोनाच्या महामारीत भारतातील पहिली राष्ट्रीय आभासी परिषद महाविद्यालयाचे मार्गदर्शक विनायक दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी यशस्वी केली.
‘जागतिक कल्याणाचे मूलभूत गुण’ हे ध्येयवाक्य घेऊन आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. संस्थेचे सहा. प्रा. हेमंत महाडिक यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि परिषदेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे डॉ. दीपक रावेरकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विविध पैलू आणि भविष्यातील आव्हाने यावर मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, “ग्रामीण भागातील महाविद्यालयाने अशा पद्धतीच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करणे हे फारच कौतुकास्पद आहे, मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल महाविद्यालयाचे आभार”.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्रीपाद वेलिंग यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भूमिकेवर जोर दिला.
“भविष्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता देखील पक्षपाती होऊ शकते, त्याचा धोका अधिक प्रमाणावर होऊ शकतो”, अशी चिंता सुद्धा यावेळी त्यांनी व्यक्त केली.
परिषदेच्या मुख्य सत्रात डॉ. हिरेन दंड यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व आणि भविष्यातील दिशा’ यावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
“AI प्रणाली जेवढी चांगली आहे तेवढीच कायद्याचे उल्लंघन करणारी, गंभीर नैतिक प्रश्न निर्माण करणारी आणि बायस ठरू शकते, त्यासाठी काळजीपूर्वक डेटा संकलन, नियमितपणे बायसचे मूल्यांकन आणि निवारण करणे, AI च्या वापरामध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करणे आवश्यक आहे”, असे ते म्हणाले.
त्यानंतर तांत्रिक सत्रात देशभरातील सहभागी अभ्यासकांनी आपापले शोधनिबंध सादर केले. यानंतर पॅनालिस्ट म्हणून लाभलेले डॉ. विनायक भराडी, विभाग प्रमुख, माहिती तंत्रज्ञान, फिनोलेक्स अकॅडमी, रत्नागिरी, डॉ. अरविंद कुणकर्णी, प्राध्यापक, आठले, सप्रे, पित्रे महाविद्यालय, देवरूख, डॉ. सचिन नरंगले, सहयोगी प्राध्यापक, स्कूल ऑफ मीडिया, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि प्रा. राहुल देशमुख, एसआरएम महाविद्यालय, कुडाळ या तज्ज्ञांनी पॅनल चर्चेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या व्यावहारिक उपयोगांवर आणि सामाजिक परिणामांवर विचार व्यक्त केले. समारोप वंदे मातरमने झाला.
परिषदेच्या अंतिम टप्प्यात शोधनिबंध सादरीकरणात
उत्कृष्ट सादरीकरण करत,
रेहान शरीफ नुरले यांनी प्रथम क्रमांक पटकावला, इंद्रजित अशोक मुळीक यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. विशेष बाब म्हणजे, सौ. नीलम कांबळे, राजेंद्र लोणे आणि प्रतीक भारद्वाज या तिघांनीही उत्तम कामगिरी करत समान गुण प्राप्त केले, ज्यामुळे त्यांना संयुक्तपणे तृतीय क्रमांक प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजन व आभार प्रदर्शन सहा. प्रा. नरेश पटकारे यांनी केले, तर सहा. प्रा. नरेश शेट्ये यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी शिक्षण, संशोधन आणि उद्योग क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी यात सक्रिय सहभाग घेतला. महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.