खारेपाटण येथे मुंबई – गोवा महामार्गावर मोटारसायकल व टेम्पो अपघातात शाळकरी युवती जखमी

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण चेक पोस्ट शेजारी काल मंगळवार १३ जानेवारी २०२६ रोजी भारत बेंझ कंपनीचा मासळी वाहतूक करणारा मोठा टेम्पो वाहन क्र. एम एच ०६ बी डब्ल्यू २२२२ व मोटार सायकल वाहन क्र. एम एच ०५ सी एक्स २४०४ यांच्यात झालेल्या अपघातात चिंचावली भंडारवाडी येथील कुमारी मिताली किशोर पेडणेकर वय – १६ ही युवती गंभीर जखमी झाली असून तिला पुढील उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात दुपारी २.१५ वाजता घडला.
याबाबत अधिक वृत्त असे खारेपाटण हायस्कूलची विद्यार्थीनी असलेली कुमारी मिताली किशोर पेडणेकर ही शाळेतून १० वी सराव परीक्षेचा पेपर संपवून आपला मावस भाऊ विग्नेश मुरलीधर शिवणेकर याच्या सोबत चिंचावली या आपल्या घरी जात असताना मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण चेक पोस्ट येथे आला असता केरळ वरून मुंबईच्या दिशेने जाणारा मासळी वाहतूक करणारा भारत बेंझ कंपनीचा टेम्पो क्र. एम एच ०६ बी डब्ल्यू २२२२ याने त्याच्या पुढे चालत असलेल्या बजाज कंपनीची मोटर सायकल वाहन क्र. एम एच ०५ सी एक्स २४०४ याला जोरदार धडक दिली या धडकेत मोटारसायकलस्वार श्री. विग्नेश मुरलीधर शिवणेकर वय – १८ हा बाजूला फेकला गेला. तर त्याचा पाठीमागे बसलेली त्याची मावस बहीण कु. मिताली किशोर पेडणेकर ही टेम्पो बरोबर मोटारसायकल सोबत सुमारे २० फूट फरफटत गेल्यामुळे तिच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर विग्नेश हा किरकोळ जखमी झाला आहे.
हा अपघात मुंबई – गोवा महामार्गावर खारेपाटण चेक पोस्ट समोर येथे घडला. यावेळी आपले कर्तव्य पार पाडत असलेले पोलिस कॉन्स्टेबल श्री. प्रशांत पाटील यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता टेम्पो वाहन चालकाला तात्काळ थांबवून टेम्पो च्या डाव्या बाजूच्या चाका जवळ अडकलेल्या मुलीला प्रथम नागरिकांच्या मदतीने बाहेर काढली. व टेम्पो चालक श्री. राजेंद्र कुमार राहणार – नावाडा,बिहार याला ताब्यात घेतले. यावेळी भार कृषी समितीचे वनरक्षक श्री. विजय भोसले व सौरभ कोरगावकर यांनी अपघात समयी तत्परता दाखवून जखमी मुलीचे प्राण वाचविले.
अपघात ग्रस्त युवक व युवती यांना तत्काळ खारेपाटण प्रा. आ. केंद्र येथे दाखल करण्यात आले. तेथे उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे. तर अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलिस स्टेशनचे पी एस आय श्री. महेश शेडगे यांनी अपघातस्थळी तातडीने भेट देऊन अपघाताची माहिती जाणून घेतली. या घटनेचा अधिक तपास खारेपाटण पोलिस दुरक्षेत्राचे कर्मचारी व कणकवली पोलिस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.

error: Content is protected !!