घोडगे-सोनवडे घाटाचे काम खासदार राऊत आणि आमदार नाईक कधीच पूर्ण करू शकत नाहीत!
भाजपचे नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांचे वक्तव्य
कुडाळ : घोडगे-सोनवडे घाटाचे काम खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक कधीच पूर्ण करू शकत नाही तर ते काम मीच १०० टक्के पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांनी घोडगे येथे विकासकामाच्या शुभारंभप्रसंगी केले.
कुडाळ तालुक्यातील कुपवडे- जांभवडे या गावामध्ये राज्यशासन तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून विविध विकासकामासाठी कोट्यवधीचा निधी आला आहे. विकासकामांचे भूमिपूजन माजी खासदार निलेश राणे व ग्रामस्थ पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष दादा साईल, भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद शिरवलकर, श्रीपाद तवटे, योगेश घाडी, मनोरंजन सावंत, अनंत पाटकर, साई दळवी, अमित तावडे, कुपवडे सरपंच दिलीप तवटे, रमेश परब, किरण गावकर, रमाकांत परब, बाबू परब, आबा बोभाटे, श्रीधर सावंत, गोपाळ तेली, विठ्ठल कदम, सागर परब, मनोहर गावकर, गोविंद गावकर, रोहिणी ढवण, काजल गावकर,सुहासिनी गावकर जांभवडे सरपंच अमित मडव, बाळकृष्ण मडव, अर्चना मडव, विशाल मडव, महादेव मडव, चंद्रकांत मडव, जाबर सावंत, धनंजय सावंत, अर्चना देसाई, संतोष पावसकर, उदय मडव, शुभांगी सावंत, फ्रान्सिस पिंटो आदी उपस्थित होते.
खासदार निलेश राणे म्हणाले की, राज्यात आपले सरकार कार्यरत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात खऱ्या अर्थाने विकासाची गंगा आली आहे. अडीच वर्षे कार्यरत असणाऱ्या ठाकरे सरकारच्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या महाविकास आघाडीने जिल्ह्यावर सातत्याने अन्याय केला होता. जिल्ह्याला विकासापासून पूर्णपणे वंचित ठेवले. राजकीय हेवेदावे व्यतिरिक्त काहीच केले नाही. गेल्या आठ महिन्यात शिंदे गटाचे शिवसेना व भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळाली आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गावागावांमध्ये कोट्यवधीचा निधी विकासासाठी आलेला आहे
हा विकास आता थांबणार नाही. अजूनही जी जी कामे आहेत ती पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मी कटिबद्ध आहे. खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी केवळ आश्वासनाच्या पलिकडे काही केलेले नाही. घोडगे-सोनवडे घाटाच्या ज्वलंत प्रश्नाचे घोंगडे आजही भिजवत ठेवले आहे. हा प्रश्न ते कधीच मार्गी लावू शकत नाही. तुमचा घाटाचा हा प्रश्न केवळ नी केवळ निलेश राणेच सोडवू शकतो. आज विकासकामाच्या निमित्ताने मी तुम्हाला शब्द देत आहे तो पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे सांगितले. यावेळी कुपवडे- जांभवडे गावाच्या वतीने निलेश राणे यांचे स्वागत करण्यात आले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ