एस. व्ही. सरांचे कार्य दीपस्तंभ प्रमाणे…-अजयराज वराडकर

साहित्यिक, पत्रकार आणि कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे माजी अध्यक्ष ‘एसव्ही’ तथा प्रा. शरद वराडकर यांचे कार्य हे दीपस्तंभ प्रमाणे असून ते आमच्यासाठी खूप मार्गदर्शक आणि अनुकरणीय असून त्यांनी साहित्यिक, पत्रकार आणि एक उपक्रमशील शिक्षक म्हणून आपल्या कार्याची ओळख निर्माण करताना प्रतिकूल परिस्थितीत शाळेची E टाईप इमारत बांधून शाळेला एक आधुनिक स्वरूप दिले. ती इमारत आजही साठाव्या वर्षी दिमाखात सेवा देत उभी आहे. एसव्ही सरांनी कट्टा पंचक्रोशीत केलेले शैक्षणिक कार्य हे अतुलनीय आहे. एसव्ही सरांनी शिक्षण, साहित्य, पत्रकारिता क्षेत्रात केलेले कार्य नव्या पिढीला समजणे गरजेचे आहे. एस व्ही सरांनी घालून दिलेल्या आदर्शावर वाटचाल करण्याचे भाग्य आम्हाला लाभले यासाठी आम्ही आम्हांला सुदैवी समजतो. योगात्मा काकासाहेबांचे कनिष्ठ सुपुत्र म्हणून शाळेचा नांवलौकिक वाढवणाऱ्या स्वर्गीय प्रा.शरद वराडकर यांच्या 90 व्या जयंतीनिमित्त कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे अध्यक्ष श्री अजयराज वराडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुनील नाईक यांनी ‘एसव्ही’ सरांनी बांधलेली
” ई” टाइप इमारत बांधताना प्रा. शरद वराडकर सरांसोबत साथ देणाऱ्या सर्व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्मरण केले. आर्थिक अडचणी आणि संघर्षातून उभ्या राहिलेल्या या इमारतीतून पंचक्रोशीतील अनेक पिढ्या घडल्या आहेत. आज सरांच्या 90 व्या जयंतीच्या निमित्ताने आपणा सर्वांची जबाबदारी वाढलेली असून मनापासून सेवाभावी वृत्तीने मूल्यात्मक दर्जा राखत आम्ही संस्थेच्या माध्यमातून तीनही युनिटना सोबत घेत शतकमहोत्सवी वर्षात जोमाने कार्य करीत राहू अशी खात्री देताना संस्थापक योगात्मा काकासाहेब आणि डॉ. दादासाहेब वराडकर यांचे कार्य आणि सेवाभावी वृत्तीचे स्मरण केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्मिता कम्प्युटरच्या संचालिका सौ श्रद्धा नाईक यांनी एसव्ही तथा प्रा.शरद वराडकर हे शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असतानाची अनुभव कथन केले व माजी विद्यार्थी म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या. गेल्या पाच सहा वर्षात संस्थेच्या चालणाऱ्या उपक्रमाबद्दल कौतुक केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने इंग्रजी विषयाच्या हस्ताक्षर स्पर्धा, हिंदी विभाग, क्रीडा विभाग, गणित विभागाच्या वतीने यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशास्तीपत्र आणि बक्षीसांचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळीच सायबर गुन्हे अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, एम के सी एल यांच्या माध्यमातून मिळालेल्या प्रमाणपत्रांचे वितरण व आदर्श शिक्षक शिक्षिका यांचे स्मिता कॉम्प्युटर कट्टाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यावेळी एसव्ही सरांनी शब्दबद्ध केलेली, अनेक वर्षे खंडित झालेली ‘शारदा स्तवन’ प्रार्थना आज एसव्ही सरांच्या जयंतीच्या निमित्याने पुन्हा शाळेत सुरु करण्यात आली.
डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्यचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, वराडकर इंग्लिश मीडियमचे मुख्याध्यापक ऋषी नाईक, वराडकर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव श्रीमती विजयश्री देसाई आदी मान्यवर तसेच सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षिकेतर कर्मचारी, शालेय पंतप्रधान आणि संसद प्रतिनिधी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संसद उपाधिपती किसन हडलगेकर यांनी केले
कार्यक्रमाची ध्वनी व प्रकाश व्यवस्था सहायक उपाधीपती भूषण गावडे यांनी केली तर आभार प्रदर्शन वराडकर इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्री ऋषी नाईक यांनी केले.
अश्या प्रकारे शिक्षक दीनाच्या पूर्वसंधेला एसव्ही सरांच्या 90व्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला.