वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघास कांस्य पदक

सावंतवाडीच्या केशर निर्गुण हिचा महाराष्ट्र संघात समावेश

निलेश जोशी । सिंधुदुर्ग : ग्वाल्हेर मध्यप्रदेश येथे झालेल्या ऑल इंडिया कॅरम फेडरेशन आयोजित 51 व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम चॅम्पियनशिप महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाला कांस्य पदक मिळाले. महाराष्ट्राच्या महिला संघात सावंतवाडीच्या कु. केशर राजेश निर्गुण हीच समावेश होता. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ऑल इंडिया कॅरम फेडरेशन आयोजित 51 व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम चॅम्पियनशिप 23-24 स्पर्धा दिनांक 6 ते 10 एप्रिल 2024 या कालावधीत ग्वाल्हेर, मध्य प्रदेश येथे झाली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने उपान्त्य फेरीत प्रवेश केला परंतु उत्तर प्रदेश कडून पराभव झाल्याने कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात तामिळनाडूचा पराभव करून कांस्य पदक मिळविले.

महाराष्ट्राच्या महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत मध्य प्रदेशवर विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. परंतु उत्तर प्रदेश विरुद्ध पराभव झाल्याने तिसर्‍या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात बिहारचा पराभव करून कांस्य पदक जिंकले. पुरुष गटात स्पर्धेचा अंतिम सामना उत्तर प्रदेश व आसाम तर महिलांच्या गटातील अंतिम सामना उत्तर प्रदेश व तेलंगणा या संघात होऊन दोन्ही गटातील विजेतेपद उत्तर प्रदेशने पटकाविले.
या स्पर्धेत पुरुष गटात एकूण 39 व महिलांच्या गटात 33 अशा एकूण 72 संघांचा समावेश होता. महाराष्ट्राच्या महिलांच्या संघात सावंतवाडीची खेळाडू व श्री. पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी मधील वाणिज्य शाखेची विद्यार्थीनी केशर राजेश निर्गुण हिचा समावेश होता. .या स्पर्धेत एकूण 233 पुरुष व 187 महिला खेळाडूंचा समावेश होता. राष्ट्रीय कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने मिळवलेल्या या यशाबद्दल श्री पंचम खेमराज महाविद्यालयातर्फे तसेच कॅरम प्रेमींकडून केशर निर्गुण हिचे अभिनंदन करण्यात येत आहे.

निलेश जोशी, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग. .

error: Content is protected !!