अखेर काँग्रेस जिल्हाध्यक्ष समीर वंजारी यांच्या नियुक्तीस स्थगिती
सिंधुदुर्गातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांसमोर प्रदेश काँग्रेस नरमले
जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिले होते तडकाफडकी राजीनामे
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी समीर वंजारी यांच्या नियुक्तीला अखेर प्रदेश काँग्रेसकडून स्थगिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे संघटन व प्रशासन सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी याबाबतचे पत्र काढले आहे. हे पत्र नव्याने नियुक्त करण्यात आलेले जिल्हाध्यक्ष समीर वंजारी व तत्कालीन प्रभारी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांचे नावे आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिलेल्या राजीनामा अस्त्राचा दबाव प्रदेश काँग्रेस वर पडल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्षपदास पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आल्याचे या पत्रात म्हटले आहे.
दिगंबर वालावलकर, सिंधुदुर्ग