कणकवली महाविद्यालयात साजरा झाला आगळावेगळा शिक्षक दिन.

विद्यार्थ्यानीच चालविले एक दिवस कॉलेज
कणकवली /मयुर ठाकूर
कणकवली महाविद्यालयात ५, सप्टेंबर रोजी वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वतः प्राध्यापक, प्राचार्य, उप-प्राचार्य व शिक्षकेत्तर कर्मचारी या जबाबदाऱ्या सांभाळून, उत्कृष्ट अध्यापन करून आणि आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळवून आगळावेगळा शिक्षक दिन साजरा केला.
यावर्षी कणकवली महाविद्यालयातील तृतीय वर्ष वर्गाच्या सर्व विभागातील वेळापत्रक तयार करून, त्यानुसार विभागवार व विषयवार नियुक्त प्राध्यापकांना तासिका वाटून देण्यात आल्या. विद्यार्थी प्राध्यापकांनी आपापल्याला दिलेल्या विषयांची उत्तम तयारी केली.
हा कार्यक्रम दोन टप्प्यात साजरा करण्यात आला. सकाळी १०.०० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी सर्व वर्गाच्या तासिका उत्तम पद्धतीने घेतल्या. विशेष म्हणजे महाविद्यालयातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी नवनियुक्त विद्यार्थी प्राध्यापकांच्या शिकवणीला उत्तम प्रतिसाद दिला.
दुसऱ्या टप्प्यात महाविद्यालयाच्या एच.पी.सी.एल. सभागृहात अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या तसेच आद्य शिक्षक महात्मा फुले व आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून विद्यार्थी शिक्षक वर्गाने शिक्षक दिनानिमित्ताने मनोगते व्यक्त केली.मयुरी राऊळ, वैभवी महाडेश्वर,सिद्धी पालव यांनी ‘या कार्यक्रमांमुळे आम्हाला शिक्षकाची भूमिका समजली, तसेच अभ्यास करून विद्यार्थ्यांसमोर गेल्याशिवाय विद्यार्थी आपल्याला योग्य प्रतिसाद देत नाहीत याची कल्पना आली असे मनोगत व्यक्त केले. तसेच शिक्षक दिनाच्या कार्यक्रमामुळे आमच्या शैक्षणिक जीवनात आम्हाला प्रेरणा मिळाली, असेही त्यांनी सांगितले. शिक्षक दिनाकरिता नियुक्त प्राचार्य ललित राऊळ कम्प्युटर सायन्स यांनी प्रास्ताविकात आपले मनोगत व्यक्त केले. नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याचे समाधान व्यक्त केले. तसेच उपप्राचार्य कु.सिद्धी पालव हिने आपले मनोगत व्यक्त करताना नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यामुळे स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला मदत झाल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे, महाविद्यालयातील जेष्ठ प्रा. डॉ.राजेंद्र मुंबरकर यांनी मनोगत व्यक्त केले.
या विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने नियुक्त विद्यार्थी प्राध्यापकांमधून कु.भावना राणे (वाणिज्य विभाग) कु. रिदा मंसुरी (कला विभाग) कु. सायली तिरोडकर व वैभवी महाडेश्वर (विज्ञान विभाग), कु. मानसी घाडीगावकर (बैफ विभाग) व जयेश पेडणेकर (कंप्यूटर सायन्स विभाग) यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. शेवटी कु. मशिरा शेख हिने आभार मानले. या उपक्रमासाठी सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले.
शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली च्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे व सचिव श्री विजयकुमार वळंजू यांनी या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचे विशेष कौतुक केले आहे.