जमिनीत बेकायदेशीर पोल उभारल्या प्रकरणी तिवरे मध्ये ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण

जोपर्यंत विद्युत खांब हटवले जात नाहीत तोपर्यंत माघार नाही
जमीन मालक विश्राम म्हाडेश्वर, वैभव म्हाडेश्वर यांचा इशारा
तिवरे गावातील भूमापन क्रमांक व उपविभाग ६७६ मधून “जल जीवन मिशन” अंतर्गत तिवरे गावच्या नळयोजनेच्या विहिरीसाठी थ्री फेज विद्युत लाईन नेण्यात आलेली आहे. याकरिता बेकायदेशीर रित्या विद्युत खांब खाजगी जमिनीमध्ये घालण्यात आले असून, त्यामुळे सदर जमीन बाधित झाली आहे. या विरोधात तेथील जमीन मालक विश्राम महाडेश्वर व वैभव म्हाडेश्वर यांनी तिवरे ग्रामपंचायत समोर 26 जानेवारी रोजी सकाळपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. सदरची विद्युत लाईन व पोल हटवंत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, सदर जमिन माझ्या मालकीची असून त्यामधून बेकायदेशीररित्या परवानगी शिवाय विद्युत खांब उभारून विद्युत लाईन नेण्यात आलेली आहे. यामुळे सदर जमिन बाधित झालेली असून या जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारची वृक्ष लागवड, बांधकाम इत्यादी कोणतेही उपयोग करू शकत नाही. सदर जमिनीची भूमी अभिलेख कार्यालय कणकवली कडून १३/११/२०२५ रोजी मोजणी झालेली आहे. त्यानुसार सोबत जमिनीच्या नकाशाची प्रत जोडलेली आहे. नकाशात A अक्षराने दाखविलेल्या भूभागातून वीज लाईन उभारण्यात आलेली आहे.माझ्या मालकीच्या जमिनीतील विद्युत पोल व विद्युत लाईन काढण्यात यावी. जर सदर विद्युत पोल व विद्युत लाईन त्वरित काढण्यात आली नाही तर आमरण उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.





