कणकवलीत 28 जानेवारीला महायुतीची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा

कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात महायुतीच्या नेतेमंडळीची असणार उपस्थिती
सभेच्या नियोजन स्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्याकडून आढावा
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची जाहीर सभा 28 जानेवारी रोजी सायंकाळी कणकवलीत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा होत असून, कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात याबाबतची नियोजन सुरू करण्यात आले आहे. एकीकडे माहिती मधील उमेदवारांचा बिनविरोध निवडीचा धडाका सुरू असतानाच निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री थेट सिंधुदुर्गात दाखल होत असल्याने ते या सभेत काय बोलणार त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या जाहीर सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निरंजन डावखरे यांच्यासहित महायुतीची प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. पोलिसांकडून आज उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात जागेची पाहणी करून आढावा घेण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांसोबत देखील पोलिसांनी चर्चा केली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी सभास्थळी भेट देत आढावा घेतला. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांच्यासहित भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, शिवसेना तालुकाप्रमुख दामोदर सावंत, पालकमंत्र्यांची स्वीय सहाय्यक राकेश परब यांच्यासह अन्य उपस्थित होते.





