टोपीवाला हायस्कूल माजी विद्यार्थी संघटना (MVS)

मेळावा २०२६ वृत्तांत
टोपीवाला हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेचा मेळावा दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी मालवण येथे शाळेच्या मध्यवर्ती सभागृहात संपन्न झाला. या मेळाव्यास मालवण, मुंबई, पुणे अशा विविध ठिकाणच्या ५० माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.
कार्यक्रमात MVS चे अध्यक्ष आणि सह-अध्यक्ष अनुक्रमे श्री. रघुनाथ शेवडे व श्री. उमेश धारगळकर, मालवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिव अनुक्रमे श्री. सुदेश मयेकर व श्री. विजय कामत, टोपीवाला हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. वळंजू व इतर शिक्षक उपस्थित होते. श्री.अविनाश आजगावकर यांच्यासारखे अनेक वरिष्ठ माजी विद्यार्थीही आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर MVS चे कार्यकारिणी सदस्य श्री. प्रमोद मोहिते यांनी सर्वांचे स्वागत केले आणि मंचावरील मान्यवरांचा परिचय करून दिला. श्री. रघुनाथ शेवडे यांनी आपल्या भाषणात सुरू असलेले प्रकल्प आणि योजना यांची माहिती करून दिली.
MVS वेबसाईटच्या टीमचे सदस्य श्री उमेश धारगळकर, श्री राजन तेंडोलकर, श्रीमती उमा आजगावकर आणि श्रीमती स्मिता करंदीकर यांचे आणि माजी विद्यार्थी तासिका हा प्रकल्प राबवणारे श्री भूषण बांदिवडेकर यांचे शेवडे सरांनी भाषणात कौतुक केले.
श्री. उमेश धारगळकर यांनी MVS ची स्थापना, कार्यपद्धती, नियम, उद्दिष्टे, आतापर्यंतचा प्रवास, विद्यमान कार्य इत्यादी विषयी पॉवर पॉइंट प्रेजेंटेशन द्वारे माहिती दिली. कार्यकारिणीच्या नियमित बैठका, वार्षिक सर्वसाधारण सभा, मेळावे इत्यादी माध्यमांतून शिस्तबद्धरित्या कार्य करून गेल्या २ वर्षात अनेक महत्त्वाच्या गोष्टी कशा पूर्ण केल्या गेल्या हे त्यांनी विषद केले.
श्री. उमेश धारगळकर यांनीच सुचवलेले “शाळेची ओढ, तिला मैत्रीची जोड!” हे MVS चे अधिकृत घोषवाक्य म्हणून या मेळाव्यात घोषित केले गेले.
सर्वांना सभासद बनण्याचे आवाहन करत मेळावा संपण्यापूर्वी सभासद संख्या ४९६ वरून ५०० व्हावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि त्या आवाहनाला मान देत ४ माजी विद्यार्थी लगेच सभासद बनले.
त्यानंतर शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक श्री. तोरगलकर सर यांनी लॅपटॉप द्वारे इंटरनेट वापरून MVS च्या वेबसाईटचे (www.mvs-ths.org) उद्घाटन केले आणि MVS ने ही वेबसाईट सर्व माजी विद्यार्थ्यांना समर्पित केली.
श्री. उमेश धारगळकर यांनी या वेबसाईटसाठी रू.७५,००० ची देणगी देऊन, आलेल्या संपूर्ण खर्चाचा आर्थिक भार उचलला आहे असे निवेदक श्री. धामापूरकर सर यांनी जाहीर केले.
MVS च्या कार्यकारिणी सदस्य आणि वेबसाइट टीम च्या सदस्या श्रीमती उमा आजगावकर धुरिया यांनी वेबसाईट मागची संकल्पना, तिथे उपलब्ध असलेली माहिती, वेबसाईटचा वापर कसा आणि कशासाठी करावा याचे विवेचन केले. त्यांनी वेबसाईट वर उपलब्ध असलेल्या विविध सुविधा दाखवल्या.
माजी विद्यार्थ्यांनी वेबसाईट वरूनच सभासद कसे व्हावे,आपली माहिती वेबसाइट वर कशी ठेवावी, आपल्या मित्र-मैत्रिणींना बॅच, नाव किंवा राहण्याचे गाव द्वारे कसे शोधावे, आपला प्रकल्प कसा सादर करावा, MVS चे विविध उपक्रम, मेळावे, प्रकल्प इत्यादींची माहिती कशी मिळवावी किंवा देणगी कशी द्यावी अशा अनेक सुविधा श्रीमती उमा आजगावकर धुरिया यांनी प्रात्यक्षिकांसह दाखविल्या.
श्री. वळंजू सरांनी शाळेत सध्या सुरू असलेले उपक्रम आणि विद्यार्थ्यांची प्रगती व विविध उपलब्धी याविषयी माहिती दिली.
श्री. सुदेश मयेकर यांनी आपल्या भाषणात MVS ची कार्यपद्धती आणि कार्य दोन्हीचे कौतुक केले. शाळेला विनाअनुदान शैक्षणिक उपक्रम कायमस्वरूपी चालू ठेवण्यासाठी आर्थिक आणि इतरही मदतीची आवश्यकता असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
MVS चे कार्यकारिणी सदस्य श्री. नंदन देसाई यांनी सर्वांचे आभार मानले आणि त्यानंतरच्या अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यकमाचे सूत्र संचालन शाळेतील शिक्षक श्री धामापूरकर यांनी केले.
कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यमान शिक्षक श्री. बनसोडे आणि श्री. अमेय नाईक यांचे सहकार्य लाभले. कन्याशाळेतील लिपिका श्रीमती कृतिका निवेकर मोलाचे सहाय्य केले.





