घोडावत विद्यापीठात भूगोल दिन साजरा’माय व्हिलेज माय मॅप’ पोस्टर स्पर्धा यशस्वी

विद्यार्थ्यांना स्थानिक भूगोलाची शास्त्रीय समज, नकाशावाचन कौशल्य आणि ग्रामीण विकासाबाबतची जाणीव वाढीस लागावी या हेतूने 14 जानेवारी भूगोल दिनाचे औचित्य साधून संजय घोडावत विद्यापीठात नुकताच भूगोल दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी भूगोल विभागाच्या वतीने ‘माय व्हिलेज माय मॅप’ स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. उद्धव भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, परीक्षा नियंत्रक डॉ. एन. के. पाटील, मानवविदया व सामाजिक शास्त्र संकुलाचे अधिष्ठाता डॉ. उत्तम जाधव, भूगोल विभाग प्रमुख डॉ. कपिल पाटील, तसेच प्रा. विशाल जाधव, प्रा. गोपाळ पाटील उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षण प्रा. आज्ञा मांजरेकर व प्रा. अंबपकर यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या गावाचा भौगोलिक नकाशा, नैसर्गिक संसाधने, लोकवस्ती, वाहतूक, जलस्रोत तसेच विकासाच्या संधी व समस्या यांचे पोस्टरद्वारे प्रभावी सादरीकरण केले. परीक्षकांनी विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, नकाशा मांडणी, विषयाची स्पष्टता व सादरीकरण कौशल्य यांचे विशेष कौतुक केले.
यासाठी विश्वस्त विनायक भोसले यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भूगोल विभागातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. याबद्दल संस्थेचे चेअरमन संजयजी घोडावत यांनी सर्वांचे अभिनंदन केले.





