माणगावच्या श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालयाच्या सुवर्ण महोत्सवाची सांगता

उत्सहात संपन्न झाला सांगता समारंभ
‘कै. सौ. नीलिमा लक्ष्मण सावंत’ सभागृहाचे उद्घाटन
कुडाळ : माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालयाचा सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ शनिवारी मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी दानशूर व्यक्तींच्या देण्यातून उभारण्यात आलेल्या ‘कै. सौ. नीलिमा लक्ष्मण सावंत.’ या सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते ‘सुवर्ण भरारी’ या वाचनालयाच्या पन्नास वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन झाले.
कार्यक्रमाची सुरुवात श्री देवी सरस्वतीच्या पूजनाने व दीप प्रज्वलनाने झाली. याच वेळी सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेले पुणेस्थित उद्योजक जी.के. सावंत यांच्या सहा लाख तसेच पुण्याच्या प्रा. आशा राणे एक लाख, दिलीप कुडतरकर 1 लाख, राजेंद्र कुडतरकर पन्नास हजार, विवेक कुडतरकर पन्नास हजार अशा बहुमोल देणगीतून साकार झालेल्या ‘कै. सौ. नीलिमा लक्ष्मण सावंत.’ या सभागृहाचे उद्घाटन झाले. तसेच मान्यवरांच्या हस्ते ‘सुवर्ण भरारी’ या वाचनालयाच्या पन्नास वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन झाले.
वाचनालयाच्या विद्यमान अध्यक्ष सौ स्नेहा योगेश फणसळकर यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ साजरा झाला यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा ग्रंथालयाचे अध्यक्ष मंगेश मसके, ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, उद्योजक कृष्णा उर्फ काका केसरकर, मालवणी कवी रुजारियो पिंटो, दिलीप कुडतरकर, माणगावच्या सरपंच सौ मनीषा भोसले, सौ आशा माळकर सावंत, माणगाव हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक वि न आकेरकर, वाचनालयाचे उपाध्यक्ष सदाशिव पाटील, सचिव एकनाथ केसरकर, जिल्हा ग्रंथालयाचे राजन पांचाळ, सतीश गावडे उपस्थित होते.
यावेळी मंगेश मसके म्हणाले, वाचनालय टिकले पाहिजे तर मराठी भाषा टिकली पाहिजे आणि मराठी भाषा टिकली पाहिजे तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, म्हणून सर्वांनी आपल्या पाल्यांना मराठी शाळेत घालावे असे आवाहन मंगेश मसके यांनी केले. हे वाचनालय अतिशय सुंदर उपक्रम घेते क्रियाशील आहे म्हणून हे माझे आवडते वाचनालय आहे. भविष्यातही या वाचनालयाला या वाचनालयाला जी जी मदत करता येणे शक्य आहे ती आम्ही जरूर करू असे आश्वासन ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी दिले.
माणगाव चे सुपुत्र असलेले उद्योजक काका केसरकर यांनी येथे चालू असलेल्या वाचनालयाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांचे पिताश्री गजानन केसरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ वाचनालयाला एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली.
दिलीप कुडतरकर यांनी वाचनालयाच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले. तर श्री. आकेरकर सर यांनी सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना वाचनालयाने जुन्या माणसांची आठवण ठेवली यासाठी वाचनालयाच्या संचालकांचे त्यांनी कौतुक केले. मान्यवरांच्या हस्ते वाचनालयाच्या माजी संचालकांचे सत्कार करण्यात आले. तसेच वाचनालायचे विद्यमान संचालक विजय केसरकर, शरद कोरगावकर, मेघश्याम पावसकर, प. बा. चव्हाण, विजय पालकर, सौ. स्नेहा माणगावकर यांच्या हस्ते वाचनालयाच्या माजी कर्मचाऱ्यांचा तसेच वाचनालयाच्या वाटचालीत विशेष मदत करणाऱ्या सर्व हितचिंतकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
सौ स्नेहा फणसळकर यांनी वाचनालयाच्या स्थापनेपासून आज सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभापर्यंत ज्यांनी ज्यांनी या वाचनालयाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच भविष्यात पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी या वाचनालयाचा जास्तीत जास्त उपयोग होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक प. बा. चव्हाण तर आभार आणि सूत्रसंचालन वाचनालयाचे सचिव एकनाथ केसरकर यांनी केले.यावेळी पांडुरंग भिसे यांनी १०५०रुपये तर उज्वला तुकाराम सावंत यांनी २५०० रुपयांची अनमोल देणगी वाचनालयाला दिली.
वाचनालयातर्फे कृष्णा कर्पे पुरस्कृत ठेवलेल्या नाईक मोचेमाडकर यांच्या ‘कालगती संग्राम’ या दशावतारी नाटकाचा सर्व रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घेतला आणि वाचनालयाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याची सांगता झाली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गेले वर्षभर वाचनालयाचे सर्व संचालक सुवर्ण महोत्सव समितीचे सदस्य तसेच वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ. प्रज्ञा कवीटकर, सहग्रंथपाल अजित आर्डेकर, लिपिक सौ अनुष्का आर्डेकर तसेच शिपाई अमोल केसरकर यांनी सहकार्य केले.





