डॉ रुपेश पाटकर यांच्या लेखनात समाज बदलाची ताकद

वेश्या व्यवसाय नसून स्त्रियांना नाडणारी संघटित गुन्हेगारी

अरुण पांडे यांचे प्रतिपादन

कणकवली/मयुर ठाकूर

डॉ रुपेश पाटकर यांचे “अर्ज मधील दिवस” या पुस्तकात समाज बदलायची ताकद आहे असे प्रतिपादन अन्याय रहित जिंदगी म्हणजे अर्ज या वेश्या व्यवसायातील समस्यांबद्दल काम करणाऱ्या सामाजिक संस्थेचे संस्थापक अरुण पांडे यांनी केले. ते सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान यांच्या सरस्वती लक्ष्मण पवार दुसऱ्या वर्षीच्या साहित्य पुरस्कार प्रदान प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

डॉ रुपेश पाटकर यांच्या “अर्ज मधील दिवस” या त्यांचे वेश्या वस्तीतील प्रत्यक्ष कामाबद्दल अनुभव लेखनाच्या पुस्तकाला या वर्षीचा सरस्वती लक्ष्मण पवार पुरस्कार सावंतवाडी इथे श्रीराम नगर वाचनालय इथे देण्यात आला. मानपत्र आणि रोख रक्कम दहा हजार रुपये असे याचे स्वरूप आहे. कार्यक्रम प्रमुख पाहुणे डॉ संजीव लिंगवत ,वेन्गुर्ला आणि ज्येष्ठ पत्रकार देवयानी वरस्कर या उपस्थित होत्या.

या वेळी डॉ रुपेश पाटकर यांचे पुस्तक समाजात बदल घडवून आणेल. प्रामाणिक आणि मोठ्या मनाने लिहिलेल्या या पुस्तकाचे मोठे योगदान आज वेश्याव्यवसाय थांबवण्यासाठी होऊ शकेल.
आजच्या वाईट स्थितीत सकारात्मक बदल होऊ शकतो, त्यासाठी लोकांनी पुढे यायला पाहिजे असे सांगणारे हे पुस्तक आहे. आज गोव्यात 25 राज्यातील तसेच बांगलादेश, नेपाळ मधीलही महिला वेश्या म्हणून काम करतात.
ते रोखायचा कायदा स्पष्ट आहे पण अंमल नाही
रोजगारिचा प्रश्न असल्याने महिला वेश्याव्यवसायात येतात असा गैर समज आहे पण ही
संघटित गुन्हेगारी असून यात महिला या लाभार्थी नसतात , मुली हा विक्रीचा पदार्थ झाला आहे. याकडे आजही गुन्हा म्हणून पाहिले जात नाही, बलात्कार मानला जात नाही हे दुर्भाग्यपूर्ण आहे. वेश्याव्यवसाय बंद व्हावा म्हणून समाज प्रबोधन, तरुणाना प्रशिक्षण असे मार्ग वापरून सर्व शक्ती लावून या विरोधात उठले पाहिजे.
हिंसा ही अज्ञानामुळे होते त्यामुळे समाजात खरे ज्ञान देणे महत्वाचे आहे, हे मोलाचे काम डॉ रुपेश पाटकर यांच्या “अर्ज मधील दिवस” या पुस्तकाने केले आहे. असे अरुण पांडे म्हणाले.

सत्काराला उत्तर देताना माझे पुस्तक हे साहित्य नसून समाजातील एका न बोलू शकणार्‍या गटाची वेदना आहे.
या गटाविषयी समाजात केवळ अज्ञान नसून गैरसमज आहेत. या गैरसमजामुळे त्यांच्या बेड्या अधिक घट्ट होतात.
हे गैरसमज दूर करण्यासाठी हे पुस्तक लिहीलेय.
हा पूर्णपणे संघटीत गुन्हा असून त्याचे लाभार्थी वेश्या वगळता इतर सर्व आहेत.
वेश्येकडे जाणाऱ्या गिर्‍हाईकामुळे हा धंदा अस्तित्वात येतो. पण या घटकाबाबत कोणीच बोलत नाही. तोच खरा ‘लैंगिक गुन्हेगार’ असतो.
आपण प्रत्येकजण असा प्रयत्न करूया की आपल्या संपर्कातील कोणतीही मुलगी या धंद्यात ओढली जाणार नाही आणि आपल्या संपर्कातील कोणताही मुलगा लैंगिक गुन्हेगार बनणार नाही असे प्रतिपादन डॉ रुपेश पाटकर यांनी केले.

डॉ संजीव लिंगवत यांनी आपल्या भाषणात डॉ पाटकर यांच्या लेखनाचा तसेच लैंगिक गुन्हेगारीबद्दल त्यांना डॉक्टर, कार्यकर्ता आणि माणूस म्हणून आलेले प्रसंग सांगून प्रबोधन केले. डॉ रुपेश पाटकर यांच्या शेकरू या प्राण्याला वाचवायच्या कौतुकास्पद प्रयत्नाचा त्यांनी उल्लेख केला.

ज्येष्ठ पत्रकार देवयानी वरस्कर यांनी आपले बालवयातील अनुभव सांगून हे पुस्तक वाचून आपल्या मनावर कशा खोल वेदना उमटल्या ते सांगितले. हे शोषण थांबण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे त्या म्हणाल्या.

यावेळी यावर्षीचा सिंधुवैभव साहित्य समूहाचा मधुसूदन नानिवडेकर काव्य पुरस्कार मिळालेल्या अंजली मुतालिक या कवयित्रीचा सत्कार करण्यात आला. त्यांनी तसेच डॉ संजीव लिंगवत आणि देवयानी वरस्कर यांनी यावेळी नानिवडेकर यांच्या स्मृतीला उजाळा दिला. यावेळी गतवर्षीच्या नानिवडेकर पुरस्काराचे विजेते डॉ अमूल पावसकर हजर होते.

कार्यक्रम प्रास्ताविक डॉ सतीश पवार यांनी केले. त्यात पुस्तकाचा थोडक्यात आढावा घेण्यात आला. हे पुस्तक हृदयद्रावक असून या लेखनाला पुरस्कार देण्याशिवाय कोणताही पर्याय प्रतिष्ठानासमोर नव्हता असे डॉ पवार म्हणाले. त्यांनी आपल्या बोलण्यात मालवणी मुलखातील भावीण, देवळीण यांच्या वेदनेवर “भाविण” ही कादंबरी लिहीणार्या डॉ भास्कर आठवले यांचा उल्लेख केला.

यावेळी सूत्रसंचालन सरिता पवार यांनी केले. आभार सीमा पवार यांनी मानले. प्रतिष्ठान अध्यक्ष शुभांगी पवार, नुपूर पवार या हजर होत्या. तांत्रिक सहाय्य शैलेश घाडी, ओंकार चव्हाण, चेतन पवार यांनी केले.

यावेळी मोठा जनसमुदाय हजर होता

error: Content is protected !!