कृषि प्रतिष्ठान द्वारे जिल्हा प्राधिकरण क्षेत्रात वृक्ष लागवड कार्यक्रमझाडे जगवा जीवन जगवा!

सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील शासकीय, अशासकीय व खाजगी संस्थांच्या सहकार्यातून या वर्षी वृक्ष लागवड अभियान हाती घेण्यात आले आहे. १ जुलै या कृषि दिनाचे औचित्य साधून या अभियानास सुरुवात करण्यात आली आहे. या वर्षी या अभियानाद्वारे २५ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ब्रिगे. सुधिर सावंत हे समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्पाचे जनक आहेत. तसेच ते नैसर्गिक शेती चळवळीचे प्रणेते आहेत. समृद्ध आणि आनंदी जीवनासाठी निसर्गाचे संवर्धन करणे हि काळाची गरज आहे. ‘झाडे जगवा जीवन जगवा’ हा नारा ब्रिगे. सुधीर सावंत यांनी जनतेला दिला आहे. निसर्गाचे संवर्धन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. म्हणून प्रत्येक नागरिकाने एक तरी झाड लावून त्याचे संवर्धन करावे असे आवाहन ब्रिगे. सुधीर सावंत यांनी केले आहे.
शुक्रवार दिनांक ४, ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वा. माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी मा. के. मंजुलक्ष्मी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा. प्रजित नायर, वन खाते व अन्य खात्यांचे प्रमुख अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितित जिल्हा प्राधिकरण गरुड सर्कल क्षेत्रात सामुहिक पध्दतीने वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. चंदन, साग, आवळा, बेल, बहावा, करंज, सिसम, खैर, लेमन ग्रास इत्यादि प्रकारची रोपे वन खात्याकडून पुरवठा करण्यात आली आहे. कृषि विज्ञान केंद्रा द्वारे आंबा, काजू, जांभूळ, फणस, शेवगा, सुरंगी, चाफा, शोभिवंत झाडे पुरवठा करण्यात आली आहेत. कृषि विज्ञान केंद्र किर्लोस आणि छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय ओरोस यांच्या संयुक्त विद्यमाने व विविध संस्थांच्या सहकार्याने हे वृक्ष लागवड अभियान यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे. आता पर्यंत १० हजार पेक्षा जास्त झाडांची लागवड पूर्ण झाली आहे. छ. शि. कृषि महाविद्यालयाच्या ग्रामिण कृषि कार्यानुभवाच्या ९० कृषिदुतांची १५ गावांमध्ये नेमणूक करण्यात आली आहे. या कृषि दुतांच्या माध्यमातून वृक्ष लागवड गावा गावात शेतकऱ्यांकडे करण्यात येत आहे. या अभियानामध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन ब्रिगे सुधीर सावंत यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग / प्रतिनिधी