डॉ. नितिन सावंत यांना कोकण आयडॉल पुरस्कार

प्रतिनिधी । कुडाळ : ग्लोबल कोकण, कोकण भूमी प्रतिष्ठान, कोकण व्हिजन फोरम आणि कोकण क्लबच्या वतीने देण्यात येणारा ‘कोकण आयडॉल सन्मान २०२३’ पुरस्कार डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत मूळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयाचे मत्स्य शास्त्रज्ञ डॉ.नितीन सावंत यांना जाहीर झाला आहे. १६ जुलै रोजी प्राचार्य बी. एन. वैद्य सभागृह दादर मुंबई येथे कोकण व्हिजन परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. सावंत यांना हा कोकण आयडॉल सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
कुडाळ तालुक्यातील मुळदे येथे कोकण कृषी विद्यापीठाच्या महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत असणाऱ्या डॉक्टर नितीन सावंत यांनी कोकणात गोड्या पाण्यात माशाची शेती याचे आदर्श मॉडेल या महाविद्यालयांमध्ये उभे केले आहे. सिंधुदुर्गातील अनेक तरुणांना महिलांना शोभिवंत माशाच्या शेतीचे प्रशिक्षण देऊन १००पेक्षा अधिक उद्योजक बनवले आहेत.शोभिवंत माशाची शेती आणि गोड्या पाण्यातील माशाची शेती या विषयात आदर्श काम यासाठी कोकण आयडॉल सन्मान पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.मत्स्य क्षेत्रात लोकाभिमुख भरीव अशा कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी डॉ सावंत यांची निवड करण्यात आली आहे. डॉ.नितिन सावंत यांचे सर्व स्तरातून अभिनदंन होत आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!