फॉर्मर आयडी नोंदणीतील तांत्रिक अडचणी दूर करा

रुपेश पावसकर यांचे तहसीलदारांना निवेदन
फॉर्मर आयडी (Farmer ID) काढताना शेतकऱ्यांना विविध तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असून, विशेषतः एकापेक्षा अधिक गावांमध्ये जमीन असलेल्या शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. या समस्येची दखल घेत जिल्हा परिषद सदस्य रुपेश अशोक पावसकर यांनी कुडाळ तहसीलदारांना निवेदन देऊन अडचणी दूर करण्याची मागणी केली आहे.
सध्या शेतकऱ्यांसाठी फॉर्मर आयडी काढणे आवश्यक ठरत आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी वेगवेगळ्या गावांच्या महसुली हद्दीत आहेत. एका गावातील जमिनीची नोंद फॉर्मर आयडीमध्ये सहज होत असली, तरी अन्य गावांमधील जमिनींची नोंद करताना तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत.
या संदर्भात अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्याकडे आपली समस्या मांडली होती. त्यानंतर पावसकर यांनी या प्रश्नाकडे तहसीलदारांचे लक्ष वेधत निवेदन सादर केले.
फॉर्मर आयडी नोंदणी प्रक्रियेत अनेक गावांमध्ये असलेल्या जमिनींची नोंद सुलभतेने होण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना कराव्यात. तसेच संबंधित शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करावे, अशी मागणी रुपेश पावसकर यांनी केली आहे.






