पिंगुळी तलावाच्या अतिक्रमणावर प्रशासन गप्प का? – मनसेचा सवाल

पिंगुळी पाझर तलावाच्या संरक्षणासाठी मनसे आक्रमक
पालकमंत्री व आमदारांना भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेचा गाजावाजा केला जात असताना, दुसरीकडे पिंगुळी येथील ऐतिहासिक पाझर तलावावर होत असलेल्या कथित अतिक्रमणाबाबत जिल्हा प्रशासन मौन का बाळगून आहे, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पालकमंत्री नितेश राणे आणि कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती जाहीर झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त परिस्थितीत समावेश करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक असताना पिंगुळी येथील पाझर तलावाला कथित अतिक्रमणामुळे धोका निर्माण होत असल्याचा आरोप किनळेकर यांनी केला आहे.
या तलावाच्या संरक्षणासाठी स्थानिक ग्रामस्थ गेल्या दोन वर्षांपासून आवाज उठवत आहेत. मात्र, जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि लघुपाटबंधारे विभागाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. तलावाच्या अतिक्रमणाबाबत तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून केवळ पत्रव्यवहार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रशासनावर नेमका कोणाचा दबाव आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीदरम्यान तलावातून अनधिकृत बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात विनापरवाना पाणी उपसा केल्याचे निदर्शनास आल्याचा दावा किनळेकर यांनी केला. असे असतानाही संबंधित विकासकाविरोधात अद्याप फौजदारी कारवाई का करण्यात आलेली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
जिल्ह्यात वनराई बंधारे उभारण्याच्या मोहिमेचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यात आला. मात्र, नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेला पिंगुळी पाझर तलाव वाचवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या ग्रामस्थांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका त्यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यावर केली.
पालकमंत्री नितेश राणे यांनी केवळ जिल्ह्यातील आठही तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाल्याचा उल्लेख करण्यापेक्षा नैसर्गिक जलस्रोतांच्या संरक्षणासाठी जनतेच्या बाजूने ठामपणे उभे राहावे. तसेच आमदार निलेश राणे यांनीही या प्रकरणातील आपली भूमिका जाहीर करावी, असे आवाहन मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केले आहे.






