पिंगुळी पाझर तलाव उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी आरोप-प्रत्यारोपांना धार !

गंगाराम सडवेलकर आणि आमदार निलेश राणे यांचे एकमेकांना देवासमोर फुल उचलण्याचे आव्हान

आर्थिक भागीदारीच्या आरोपांनी राजकीय वातावरण तापले

पिंगुळी पाझर तलाव वाचवण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले बेमुदत उपोषण आज दुसऱ्या दिवशीही सुरू होते. तलावाच्या बाजूला प्रस्तावित असलेल्या बंगला प्रकल्पामुळे तलावाचे अस्तित्व आणि पाणी दूषित होण्याची शक्यता व्यक्त करत ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने आमदार निलेश राणे आणि जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे.

पिंगुळी पाझर तलावाच्या संरक्षणासाठी ग्रामस्थांनी सोमवारपासून सडवेलकर यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज दुसऱ्या दिवशीही ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी संजय वेतुरेकर आणि हेमंत देशपांडे यांनी उपोषणकर्त्यांना मार्गदर्शन केले. तलाव वाचवण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने पुढे येण्याचे आवाहनही करण्यात आले.

दरम्यान, आमदार निलेश राणे यांनी व्हिडिओ प्रसिद्ध करून माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका केली. तसेच जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांनी संबंधित बंगला प्रकल्पाच्या विकासकासोबत जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी, निवडणुकीदरम्यान आणि निवडणुकीनंतर आर्थिक तडजोड केल्याचा आरोप केला. हे आरोप खोटे असतील तर सडवेलकर यांनी पिंगुळी ग्रामदेवतेसमोर येऊन देवावरचे फूल उचलावे, असे आव्हान राणे यांनी दिले.

या आरोपांना सडवेलकर यांनीही व्हिडिओद्वारे प्रत्युत्तर दिले. आमदार राणे यांनी केलेले आर्थिक तडजोडीचे आरोप त्यांनी स्पष्टपणे फेटाळून लावले. उलट, प्रस्तावित बंगला प्रकल्पामध्ये राणे परिवाराचीच आर्थिक भागीदारी असल्याचा आरोप त्यांनी केला. हा आरोप खोटा असेल तर आमदार निलेश राणे यांनीही पिंगुळी ग्रामदेवतेसमोर येऊन देवावरचे फूल उचलावे, असे प्रतिआव्हान सडवेलकर यांनी दिले.

या आंदोलनाला माजी आमदार वैभव नाईक, अमित सामंत, धीरज परब, अभय शिरसाट यांच्यासह पिंगुळीतील ग्रामस्थ, सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली. पाझर तलावाच्या संरक्षणासाठी सुरू झालेल्या आंदोलनाला आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांची किनार लाभल्याने या प्रकरणाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!