नेरूर चव्हाटा बाजारपेठेत माकडांचा उच्छाद

बंदोबस्तासाठी रुपेश पावसकरांची वनविभागाकडे मागणी

तालुक्यातील नेरूर चव्हाटा बाजारपेठेत माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे व्यापारी, ग्राहक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बाजारपेठेतील विक्रीसाठी ठेवलेला माल तसेच नागरिकांच्या हातातील वस्तू माकडांकडून पळवून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. या समस्येची दखल घेत जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी वनविभागाकडे निवेदनाद्वारे तातडीने माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
नेरूर चव्हाटा बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी ठेवलेली फळे, भाजीपाला, खाद्यपदार्थ तसेच अन्य वस्तू माकडे सर्रास उचलून नेत आहेत. माकडांची संख्या मोठी असल्याने त्यांना हुसकावून लावणेही व्यापाऱ्यांसाठी कठीण झाले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून ग्राहकांनाही खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, बाजारपेठेतून ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या हातातील बॅगा अचानक हिसकावून माकडे पळून जात असल्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी वनविभागाचे लक्ष वेधले आहे. संबंधित वनक्षेत्रपालांनी या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि नेरूर चव्हाटा बाजारपेठेतील व्यापारी, ग्राहक व प्रवाशांना माकडांच्या उपद्रवातून दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

error: Content is protected !!