राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेत कणकवलीचे सुपुत्र डॉ. पराग नलावडे प्रथम क्रमांकाचे मानकरी

देशभरातील ६१२ छायाचित्रकारांच्या ७०९८ छायाचित्रांमधून निवड; ५० हजार रुपये आणि सन्मानचिन्हाने गौरव

ठाणे महानगरपालिका आणि फोटो सर्कल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘आविष्कार २०२६’ या २७ व्या ठाणे महापौर राष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन व प्रतिष्ठेच्या स्पर्धेत कणकवलीचे सुपुत्र डॉ. पराग नलावडे यांनी प्रथम क्रमांक पटकावत कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या यशाबद्दल त्यांना ५० हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
देशातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेत देशभरातील सुमारे ६१२ छायाचित्रकारांनी तब्बल ७०९८ छायाचित्रे सादर केली होती. या छायाचित्रांमधून डॉ. पराग नलावडे यांच्या ‘नेचर – वाइल्ड लाइफ’ या छायाचित्राला सर्वोत्कृष्ट ठरवत प्रथम क्रमांक देण्यात आला.
डॉ. पराग नलावडे हे कणकवलीचे सुपुत्र असून त्यांचे प्राथमिक शिक्षण कणकवली येथील विद्यामंदिर हायस्कूलमध्ये झाले. मुंबईतील महाविद्यालयातून वैद्यकीय पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी छायाचित्रण क्षेत्रातही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. वैद्यकीय व्यवसाय सांभाळत त्यांनी गेली अनेक वर्षे छायाचित्रणाचा छंद जोपासला आहे. विशेषतः निसर्ग आणि वन्यजीव छायाचित्रणात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
त्यांच्या ‘नेचर – वाइल्ड लाइफ’ या छायाचित्राला यापूर्वीही विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवरील स्पर्धांमध्ये गौरव प्राप्त झाला आहे. तसेच त्यांच्या छायाचित्रांना विविध प्रतिष्ठित व्यासपीठांवरून पुरस्कार मिळाले आहेत.
या राष्ट्रीय स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी मुंबईतील सुनील मराठे, ठाण्यातील भास्कर आठवले, मुंबईतील शशांक राजवीत आणि पालघर येथील अमोल वर्तक या मान्यवर परीक्षकांनी सहभाग घेतला. परीक्षकांनी देशभरातून आलेल्या छायाचित्रांचे कलात्मकता, विषयाची मांडणी, तांत्रिक गुणवत्ता आणि प्रकाशयोजना अशा विविध निकषांवर परीक्षण केले.
छायाचित्रकलेला प्रोत्साहन देणे आणि देशभरातील छायाचित्रकारांना आपली कला सादर करण्यासाठी राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धेतील निवडक छायाचित्रांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते.
डॉ. पराग नलावडे यांच्या या यशामुळे कणकवलीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून त्यांच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!