वृद्ध आई-वडिलांच्या संरक्षणासाठी न्यायाधिकरणाचा आदेश

मुलगा-सुनेला घर सोडण्याचे निर्देश
वृद्ध आई-वडिलांना स्वतःच्या घरात सुरक्षित आणि सन्मानाने राहता यावे, यासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर सुनावणी घेत सावंतवाडी येथील ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या आदेशानुसार, वृद्ध आई-वडिलांना त्रास होऊ नये आणि त्यांना शांततापूर्ण वातावरणात राहता यावे, यासाठी मुलगा आणि सुनेला संबंधित घरातून बाहेर जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वेंगुर्ला तालुक्यातील आरवली येथील ज्येष्ठ नागरिकांनी आई-वडील व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम, २००७ अंतर्गत उपविभागीय दंडाधिकारी तथा ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण, सावंतवाडी यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. वृद्धापकाळात स्वतःच्या घरात सुरक्षित व सन्मानपूर्वक वास्तव्य करता यावे, तसेच शारीरिक आणि मानसिक त्रासापासून संरक्षण मिळावे, अशी मागणी अर्जाद्वारे करण्यात आली होती.
या प्रकरणात अर्जदारांच्या वतीने अॅड. दत्ताराम राजीव बिले यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. राजीव दत्ताराम बिले, अॅड. तेजस सावंत आणि अॅड. हेमांगी वरहाडकर यांनी सहकार्य केले.
न्यायाधिकरणाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत तसेच सादर केलेल्या कागदपत्रांचा विचार करून अर्ज अंशतः मंजूर केला. त्यानुसार, अर्जदारांना त्यांच्या घरात शांततेत व सुरक्षितपणे राहता यावे यासाठी प्रतिवादींना घरातून बाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच त्यांनी अर्जदारांना कोणत्याही प्रकारचा शारीरिक किंवा मानसिक त्रास देऊ नये, त्यांचा अपमान करू नये अथवा धमकी देऊ नये, असेही स्पष्ट निर्देश दिले आहेत.
दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणासाठी संबंधित पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार यांनाही कायद्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश न्यायाधिकरणाने दिले आहेत.
हा आदेश उपविभागीय दंडाधिकारी तथा पीठासीन अधिकारी, ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण, सावंतवाडी यांनी पारित केला आहे. या निर्णयामुळे वृद्ध आई-वडिलांच्या सुरक्षितता आणि सन्मानाने जगण्याच्या अधिकाराला न्यायाधिकरणाकडून संरक्षण मिळाले आहे.






