जि प शाळेत शिक्षकांसाठी पालक करताहेत खर्च !

कुडाळ शिक्षण विभाग करतंय पालकांची दिशाभूल

मांडकुली ग्रामस्थ संतप्त : घेतली गशिअची भेट

अवघ्या सहाव्या दिवशीच शिक्षकाची बदली

गेली काही वर्षे शाळेवर होतोय अन्याय

निलेश जोशी । कुडाळ : चारवर्ष मागणी करून सुद्धा कुडाळ पंचायत समिती शिक्षण विभाग पदवीधर शिक्षक देत नसल्याने पालकांना मुलांच्या भवितव्यासाठी स्वतःच्या खिशातून शिक्षण स्वयंसेवक नेमावा लागत आहे. हि परिस्थिती आहे  कुडाळ तालुक्यात मांडकुली येथील जिल्हा परिषदेच्या एक नंबर शाळेमध्ये. येथील शालेय शिक्षण समिती आणि पालक यांनी  वारंवार मागणी करून सुद्धा गेली चार वर्षे पदवीधर शिक्षक दिले जात नाहीत. यंदा एक पदवीधर शिक्षक दिला पण शाळा सुरु झाल्यापासून अवघ्या सहाव्या दिवशी त्यांची नेमणूक कुंदे शाळा नंबर एक येथे करण्यात आली.  त्यामुळे मांडकुली ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. कुडाळचा  शिक्षण विभाग केवळ कागदोपत्री पदवीधर शिक्षक पद भरून पालकांची  दिशाभूल करत असल्याचे त्यांनी  म्हटले आहे. आज या पालकांनी कुडाळचे गट शिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांची भेट घेऊन शाळेत पदवीधर शिक्षक देण्याची मागणी केली, पण शिक्षण विभागाने उपशिक्षक देतो असे सांगून पालकांची तात्पुरती बोळवण केली.  


   मांडकुलीच्या जिल्हा परिषद शाळा नंबर एक येथे १ली ते ७वी पर्यंत वर्ग असून गेली ३-४ वर्षे २ पदवीधर शिक्षक पद रिक्त होती. मात्र सध्या  २ पदवीधर शिक्षक पदांची भरती केलेली असली तरी त्यातल्या सुयोग धामापूरकर यांची शाळा सुरु झाल्यापासून अवघ्या ६व्या दिवशी कुंदे शाळा नं.१ इथं कामगीरी शिक्षक म्हणून पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून  नेमणूक करण्यात आली.  २ वर्षे कोरोना काळामुळे तसेच शाळेतल्या शिक्षकांची पदे रिक्त असल्याने मुलांचे शैक्षणीक नुकसान होऊ नये या करीता पालकांनी स्व-खर्चाने स्वयं शिक्षक/सेविकांची नेमणूक केली होती. पण आता मागणी करूनसुद्धा नेमलेला शिक्षकच सहाव्या दिवशी अन्य शाळेत गेला तर मुलांनी शिकायचं कस असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.     या संदर्भात आज शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष रिया परब तसेच उप सरपंच तुषार सामंत, विजय साऊळ, विनोद काळसेकर, दीपिका गावकर, विनया परब, संजना नेमळेकर यांनी शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख संजय पडते, नागेंद्र परब, अतुल बंगे, बबन बोभाटे, राजू गावंडे यांच्यासह गट शिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांनी भेट घेतली.
   शिक्षणविभागाने तात्पुरत्या स्वरूपात पदवीधर ऐवजी उप शिक्षक देऊन पालक आणि ग्रामस्थांची तात्पुरती बोळवण केली आहे. असे असले तरी  पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांनी या संदर्भात गटशिक्षण अधिकारी आणि  गटविकास अधिकारी यांची वारंवार भेट घेऊनही पंचायत समिती शिक्षण विभागाकडून मुलांचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही, हे पण तेवढेच सत्य आहे.    शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर  या जिल्ह्याचे आहेत. तरी सुद्धा शिक्षक मिळत नाहीत. त्यासाठी पालकांना आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून शिक्षण स्वयंसेवक नेमावे लागत आहेत, हे सिंधुदुर्ग सारख्या शिक्षणात राज्यात अव्वल असलेल्या जिल्हयाला  आणि गतिमान प्रशासनाला शोभणारे नाही एवढे मात्र नक्की.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!