उत्तम नियोजन आणि अभ्यासातील सातत्य आपल्याला यशाकडे घेऊन जातं !

आयएस वसंत दाभोलकर यांचे प्रतिपादन

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेत ‘रहस्य उत्तुंग यशाचे’ कार्यक्रम

निलेश जोशी । कुडाळ : स्पर्धा परीक्षेतील यशस्वीतेसाठी कठोर श्रमास पर्याय नाही. यासाठी निश्चित ध्येय, योग्य नियोजन आणि अभ्यासातील सातत्य महत्त्वाचे आहे. या गोष्टी आपल्याला यशाकडे घेऊन जातात, असे प्रतिपादन आयएएस परीक्षा उत्तीर्ण झालेले वेंगुर्ले- दाभोलीचे सुपुत्र वसंत दाभोलकर यांनी केले. बॅरिस्टर नाथ पै करिअर अकॅडमी व बॅ.नाथ पै फाउंडेशन ऑफ कोकण डेव्हलपमेंट तर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर ‘रहस्य उत्तुंग यशाचे ‘या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते.

पालकांशी संवाद साधताना वसंत दाभोलकर म्हणाले, आपल्या मुलांसमोर मोठी स्वप्न ठेवून त्यांना इतर गोष्टींमध्ये सुद्धा रस घेऊन अभ्यास करण्याची मानसिकता तयार करणे गरजेचे आहे. त्यामुळे इतर विषयांवर सुद्धा प्रश्न विचारल्यास त्याची अचूक उत्तर देता येतात.असे सांगितले. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तर देताना समस्यांचा बाऊ न करता आहे त्या परिस्थितीत आपण आपल्या अभ्यासाची सोय करावी, आपण सामान्य कुटुंबात असूनही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकूनही सिंधुदुर्गाच्या दशावतार सारख्या सांस्कृतिक परंपरेने दिलेले संस्कार विसरलो नाही. ते सुद्धा युपीएससी परीक्षेचा अभ्यास करता उपयोगी ठरले. अभ्यासासाठी आवश्यक तेवढाच मोबाईलचा वापर केला, काही सण समारंभ हे जर अभ्यासाच्या आड येत असतील, त्यात वेळ वाया जात असेल तर त्याचा सुद्धा काही वेळा त्याग करण्याची मानसिकता ठेवावी लागते .मात्र मन मोकळं करण्यासाठी सिंधुदुर्गाच्या निसर्गाचा सुद्धा आनंद घेतला एवढेच नव्हे तर अभ्यासाबरोबर व्यक्तिमत्त्वाचा विकास करणाऱ्या विविध स्पर्धा विविध कला, कौशल्य, डान्स इ. सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये सुद्धा सहभागी झालो .त्यामुळे आपल्याला आपलं ज्ञान वाढवून चतुरस्त्र होता आलं, असे दाभोलकर म्हणाले.

विद्यार्थ्यांनी व्हाट्सअप, फेसबुक वरील निरर्थक गोष्टींमध्ये वेळ न घालवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे, वेळेचे नियोजन करत नियोजनानुसार अभ्यास करणे आवश्यक असल्याचे सांगत कठोर श्रमात पर्याय नसल्याचेही कथन केले. मात्र विविध परीक्षांचा अभ्यास हा महाविद्यालयीन जीवनात सुरू करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. तसेच लोकसत्ता, टाइम्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र टाइम्स अशा वृत्तपत्रांचे सूक्ष्म वाचन, युट्युब वरील दैनंदिन बातम्यांचे सूक्ष्म विश्लेषण हे ही महत्त्वाचे असल्याचे सांगितले आणि असे चतुरस्त्र ज्ञान आपल्या आयएएस परीक्षेतील यशाचे गमक असल्याचे सांगत विविध प्रश्नांच्या अनुषंगाने यूपीएससी, आयपीएस, आयएएस सारख्या स्पर्धा परीक्षांमधील स्वानुभव कथन करीत अभ्यास कसा करावा या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. मात्र एक-दोन परीक्षा देऊन यश येत नसेल तर प्लान बी तयार ठेवून दुसऱ्या परीक्षांचा ,पर्यायांचा विचार करण्याची मानसिकता नैराश्य टाळू शकते. याचाही आवर्जून उल्लेख केला.

वसंतच्या या यशाबद्दल अभिमान बाळगताना त्याच्या मातोश्री सुप्रिया दाभोलकर यांनी सुद्धा वसंत हा लहान असल्यापासून जिद्दी होता, मेहनती होता, आणि आहे त्या परिस्थितीमध्ये समायोजन करण्याची उपजत त्याच्यामध्ये मानसिकता होती आणि त्यामुळेच तो हे यश संपादन करू शकला. अशीच मानसिकता सिंधुदुर्गातील मुलांनी बाळगावी असेही त्यांनी सांगितले.

बॅ.नाथ पै सेंट्रल स्कूलच्या उपप्राचार्य विभा वझे यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे आई-वडील कमलाकर-सुप्रिया दाभोलकर, राखी दाभोलकर, श्रीम. आजगावकर, डॉ. व्यंकटेश भंडारी, तसेच प्राचार्यां सौ. शुभांगी लोकरे, बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व विविध अभ्यासक्रमाचे प्राचार्य प्राध्यापक व करिअर अकॅडमी चे समन्वयक हे उपस्थित होते.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!