गोव्यातील वास्को येथे फुटपाथवर निराधार वंचित अवस्थेत जगणा-या राजु या दिव्यांग, आजारी व श्रमजीवी जेष्ठ नागरिकाला मिळाला संविता आश्रमचा आधार

पाय फ्रँक्चर झाल्याने उदरनिर्वाहासाठी मोलमजूरीचे काम शक्य नसलेल्या मजूर राजु यांना होती आधाराची गरज

पणदूर : आपल्या देशातील गोवा या मुख्यतः पर्यटनावर आधारलेल्या छोट्याशा राज्यातील बहुतांश माणसं तशी खावून पिऊन सुखी समाधानी…म्हणजेच गोवेकरांच्या भाषेत सुशेगात आहेत.मात्र याच गोव्यातील वास्को येथे फुटपाथवर निराधार वंचिततेचे जीवन जगणा-या एका ६० वर्षीय आजोबांना नुकतेच जीवन आनंद संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने म्हापसा पोलिस स्टेशनच्या पिएसआय श्रीम.विभा वाँलवईकर यांच्या पत्राआधारे जीवन आनंद संस्थेच्या पणदूर येथील संविता आश्रमात नुकतेच दाखल केले.

मुळचे कर्नाटक राज्यातील कारवारकडचे असलेल्या श्री.राजु यांना जवळचे कोणीही नातलग नाही.असे त्यांचे म्हणणे आहे.त्यांचा एक पाय फ्र्ँक्चर झालेला असून सद्या त्यांना चालताही येत नाही. पाय धडधाकट असताना ते मोलमजूरी करून स्वतःचा  उदरनिर्वाह करू शकत होते. मात्र पाय फ्रँक्चर झाल्याने तशा स्थीतीत या श्रमजीवी व्यक्तीला काम करता येणे शक्यच नसल्याने आधाराची आत्यंतिक गरज होती.

  जीवन आनंद संस्थेचे गोव्यातील कार्यकर्ते प्रसाद आंगणे व श्रेयस मेस्त्री ह्यांनी राजु यांची निराधार वंचिततेची स्थीती समजून घेतली. वास्को येथून त्यांना ताब्यात घेवून त्यांना माणूस म्हणून सुरक्षिततेचे आणि सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी संस्थेच्या संविता आश्रम (पणदुर ता.कुडाळ) येथे दाखल केले. यामुळे पदपथावर निराधार जीवन जगणा-या एका श्रमजीवी जेष्ठ नागरिक असलेल्या दिव्यांग व्यक्तीला आधार मिळण्यास मदत झाली असल्याने संस्थेचे संस्थापक सचिव संदिप परब यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.
 जीवन आनंद संस्था रस्त्यावरील निराधार वंचितांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असून संस्थेचे गोवा राज्यासह महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, मुंबई,विरारफाटा पालघर या सर्व ठिकाणी आश्रम,शेल्टर होम व दारिद्र्याच्या कारणाने पदपथावर राहत असलेल्या नागरिकांच्या बालकांसाठी मुंबईत खाररोड व दहिसर येथे डे केअर सेंटर सुरू आहेत....या सर्व कार्यात गोवा आणि महाराष्ट्रातील संवेदनशील जनतेचा व हितचिंतक मंडळींचा मोठा पाठिंबा आणि सहभाग मिळत असल्याचे श्री.संदिप परब यांनी यावेळी आवर्जुन म्हटले आहे.

किसन चौरे,कोकण नाऊ

error: Content is protected !!