चिंदर सडेवाडी येथे महिला दिन उत्साहात साजरा; ‘वृक्ष आणि डिश’ वाटपातून दिला पर्यावरण व स्वावलंबनाचा संदेश

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चिंदर सडेवाडी येथील नाथ गोसावी युवक मंडळाने महिलांसाठी विविध स्पर्धात्मक उपक्रम राबवत अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा केला. केवळ उत्सव न करता “महिला हा कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. त्यांचा सन्मान करणे आणि त्यांना निसर्गाशी जोडणे या मुख्य हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.. यावेळी उपस्थित सर्व 38 महिलांना फळझाडांची रोपे आणि भेटवस्तू (डिश) यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे औचित्य साधून नवनियुक्त पंचायत समिती सदस्य दीपक सुर्वे यांचा मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांसाठी विविध मनोरंजक आणि कौशल्य आधारित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सडेवाडीतील गोसावीवाड, हडकरवाडी, देवकोडवाडी या वाडीतील 38 महिलांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या स्पर्धांमधून महिलांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळाले.
स्पर्धात्मक उपक्रमामध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या प्रथम तीन क्रमांकांच्या विजेत्या 1) समीक्षा कांबळी, 2) स्वाती सुर्वे, 3) अंजली गोसावी या महिलांना मंडळाच्या वतीने विशेष आकर्षक डब्याची भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रत्येक महिलेला फळझाडांचे वाटप करण्यात आले. या बाबत घराघरात वृक्षारोपण व्हावे आणि पर्यावरणाचे रक्षण व्हावे,” या उद्देशाने हा स्तुत्य निर्णय घेतल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले . तसेच प्रत्येक महिलेला आठवण म्हणून उपयुक्त डिशचेही वाटप करण्यात आले.
”महिला हा कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. त्यांचा सन्मान करणे आणि त्यांना निसर्गाशी जोडणे हाच या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.”
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.





