आंबेलीत मोरीचा भाग बाजूपट्टीसह कोसळला

अपघाताची भीती;’बांधकाम’च्या दुर्लक्षामुळे पहिल्याच पावसात पडझड
दोडामार्ग वीजघर मार्गावरील आंबेली येथील मोरीचा एका बाजूचा भाग बाजूपट्टीसह कोसळल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.
त्या मोरीचा काही भाग खचला होता. त्या ठिकाणी रस्ता मुळात अरूंद आहे, त्यामुळे अपघाताची भीती होतीच. अपघात टाळण्यासाठी त्या ठिकाणी नवीन मोरी बांधावी अशी मागणी गेली दोन वर्षे होत होती. रस्त्याचे डांबरीकरण करताना मोरी बांधकाम केले जाईल, असे संबधित अधिकारी सांगायचे.गेल्या वर्षी डांबरीकरण झाले; मात्र बांधकाम विभागाने काम केले नाही. त्याचा फटका म्हणून पहिल्याच पावसात मोरीचे बांधकाम कोसळले. तो रस्ता त्यामुळे आणखी अरूंद झाल्याने बाजू घेताना वाहनांचा अपघात होण्याची शक्यता आहे. केवळ पत्र्याची पिंपे उभी करून अपघात टाळता येणार नाहीत, त्यासाठी बांधकाम विभागाने तातडीने त्या ठिकाणी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.
प्रतिनिधी l दोडामार्ग





