कुडाळ हॉटेलमधील त्या आत्महत्या प्रकरणाचे उच्चस्तरीय चौकशी करा

मनसेची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी

“आत्महत्या की घातपात” यापेक्षा अनैतिक धंद्यांच्या मागील रॅकेटचा बिमोड होणे आवश्यक;मनसेने वेधले लक्ष

निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ मधील “त्या” आत्महत्या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशीची मागणी मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कुडाळ येथील एका हॉटेलमध्ये अलीकडेच मुंबई येथील विवहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर सदरची महिला मुंबईहून कुडाळच्या त्या हॉटेल मध्ये नेमक्या कोणत्या कारणासाठी आलेली होती ? तिच्या शेजारच्या रूम मध्ये असणारे ते दोघे युवक यांचा तिच्याशी नेमका कोणता संबंध होता ? या सर्व प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत राहत असून संपूर्ण प्रकरण संशयास्पद वळणावर असल्याचे नमूद करत “आत्महत्या की घातपात” यापेक्षा प्रकरणाशी संबंधित रॅकेटचा शोध पोलीस प्रशासनाने घ्यावा याकडे लक्ष वेधले आहे. सदरील प्रकरणाचा थेट संबंध जिल्हात स्थानिक पातळीवर चालू असलेल्या वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या रॅकेटशी असल्याची खमंग चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये जोर धरू लागल्याचे नमूद केले आहे.
कोविड लॉक डाऊननंतर जिल्ह्यात ड्रग्स, चरस-गांजा व वेश्या व्यवसाय या अनैतिक धंद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसत असून तरुण पिढी याची मोठ्या प्रमाणावर शिकार बनत आहे, हे खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे. ओरोस व कुडाळ मधील काही हॉटेल्समध्ये सेक्स रॅकेट कार्यरत असल्याच्या तक्रारी याआधी होऊन देखील स्थानिक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे त्याला अधिक खत पाणी मिळाले ही खरी वस्तुस्थिती आहे. आजच्या घडीस कुडाळ पोलीस “आत्महत्या की घातपात” याविषयी चौकशी करत आहेत; परंतु सदरची महिला मुंबईहून कुडाळ मध्ये इव्हेंटच्या नावाखाली दाखल होणे व शेजारील रूम मधील “त्या” दोघांचा वावर यामागचं नेमकं कनेक्शन शोधून पोलिसांनी प्रकरणाच्या मुळापाशी जाणे अत्यंत गरजेचे आहे.
“आत्महत्या की घातपात” हा खरा प्रश्न नसून हे नेमकं कसलं रॅकेट चालविले जात आहे, या मागे नेमके कोण आहे, घटनेनंतर संबंधित हॉटेल मधील सीसीटीव्ही फुटेज करप्ट झाले की केले गेले यामुळे अधिक संशय बळावला असून याचा पारदर्शी तपास होण्याची गरज आहे. जिल्ह्यातील तरुण पिढी वाम मार्गापासून दूर होणे काळाची गरज असून या प्रकरणाचे “धागे दोरे” परिस्थितीच्या मुळापर्यंत जाणारे आहेत असे एकंदर चित्र असून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर व तपासावर अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. तरुण पिढी बरबाद करणाऱ्या अनैतिक व्यवसायांच्या रॅकेटचा मुळासकट बिमोड व्हावा यासाठी सदर प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून उच्च स्तरीय चौकशी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान कुडाळ पोलिसांच्या तपासावर मनसेकडून एकप्रकारे शंका उपस्थित करण्यात आली असून जिल्हा पोलीस अधीक्षक नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!