कणकवली नगरपंचायतची कुत्र्यांची नसबंदी मोहीम कायद्याच्या कचाट्यात

कुत्र्यांच्या पर्यटन केंद्रातील व्यवस्थेबाबत ॲनिमल वेल्फवेअर प्रतिनिधींकडून आक्षेप
जिल्हाधिकाऱ्यांसह प्रमुख अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्याने एकच खळबळ
कणकवली नगरपंचायत मार्फत राबवली जात असलेली भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीची मोहीम वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ॲनिमल वेल्फवेअर प्रतिनिधींकडून आक्षेप घेतला गेल्याने काल सोमवारी कणकवलीतील या मोहिमेबाबत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कणकवली नगरपंचायत च्या कुत्रे पकडून नसबंदी करण्यासाठी ठेवलेल्या पर्यटन सुविधा केंद्रात भेट दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीने येथे मात्र एकच खळबळ उडाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी यांनी येथील परिस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी प्रशासनाच्या एकूणच कार्यपद्धतीबाबत देखील जिल्हाधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. ॲनिमल वेल्फवेअर साठी काम करणाऱ्या मुंबईतील एका महिला पदाधिकाऱ्याकडे स्थानिकांकडून तक्रारी दाखल झाल्याची माहिती त्या महिला पदाधिकारी यांनी दिली. त्यानंतर त्यांनी स्वतः जातीनिशी कणकवली नगरपंचायत च्या पर्यटन सुविधा केंद्र मध्ये एकत्र केलेल्या कुत्र्यांच्या तेथील सुविधांबाबत पाहणी केली. तसेच अँटी रॅबिट लसीकरण संदर्भात रजिस्टर व त्या अनुषंगाने माहिती घेतली. यामध्ये त्यांना तफावत आढळल्याचे आढळले. दरम्यान यानंतर त्यांनी तातडीने सदरची बाब जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या निदर्शनास आणली. त्यानंतर जिल्हाधिकारी तहसीलदार व महसूल चे अधिकारी व नगरपंचायत मुख्याधिकारी या तातडीने पर्यटन सुविधा केंद्राच्या ठिकाणी दाखल झाल्या. यावेळी त्या महिला पदाधिकाऱ्यांने प्रश्नांची सरबत्ती करताच प्रशासन निरुत्तर झाल्याचे समजते. दरम्यान कुत्र्यांची नसबंदी करताना त्याकरता सुप्रीम कोर्ट च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन झाले नसल्याची बाब देखील यावेळी समोर आली. त्यामुळे याबाबत जिल्हाधिकारी व कणकवली नगरपंचायत बाबत काय भूमिका घेणार त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दिगंबर वालावलकर कणकवली





