शिवसेना आमदार निलेश राणे यांना कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या जाहीर शुभेच्छा

निवडणुकीच्या विजयानंतर संदेश पारकर यांच्याकडून पहिल्यांदाच निलेश राणेंच्या फोटोचा बॅनरवर वापर

गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त साधला जाण्याची शहराच्या राजकारणात चर्चा

कुडाळ मालवण चे शिवसेनेचे आमदार आणि शिवसेनेची मुलुख मैदान तोफ समजले जाणारे नेते निलेश राणे यांचा वाढदिवस साजरा होत असताना यानिमित्त कणकवली शहरात ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी त्यांना शुभेच्छा देणारे लावलेले बॅनर हे लवकरच शुभ मुहूर्त साधण्याचे संकेत देणारे ठरत आहेत. कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीत शहर विकास आघाडी करिता निलेश राणे थेट मैदानात उतरले होते. यावेळी त्यांनी भाजपाच्या उमेदवारांच्या विरोधात भूमिका घेत असताना शहर विकास आघाडी म्हणून संदेश पारकर यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. संदेश पारकर यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्याचे त्यांच्याच घरासमोरील जाहीर सभेमध्ये मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले होते. मात्र आज दिवसापर्यंत संदेश पारकर यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला असे सांगितल्यावर या पदावर आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. त्यातच ते नगराध्यक्ष झाल्यानंतर ठाकरे शिवसेनेच्या व्यासपीठावर देखील अनेक कार्यक्रमांना दिसून आले. नुकत्याच झालेल्या आंबा बागायतदारांच्या मोर्चामध्ये सरकारच्या विरोधी घेतलेल्या भूमिकेमध्ये देखील संदेश पारकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यामुळे संदेश परकर काय करणार? याकडे साऱ्यांचे लक्ष असतानाच या साऱ्या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेनेचे नेते मुलुख मैदान तोफ म्हणून महाराष्ट्रात परिचित असलेल्या निलेश राणे यांना शुभेच्छा देणारे बॅनर लागल्याने येत्या काळात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्त साधला जाणार असल्याची देखील चर्चा सुरू झाली आहे. संदेश पारकर हे मध्यंतरी भाजपमध्ये जातील अशी चर्चा होती. त्यातच शहराच्या विकासासाठी निधी आणण्याकरिता सत्ताधारी पक्षाची कास धरावी लागणार असे देखील त्यांनी खाजगीत सांगितले होते. मात्र भाजप की शिवसेना हे स्पष्ट झालेले नसतानाच आता निलेश राणे यांचा जाहीर शुभेच्छा देणाऱ्या बॅनर लावल्याने संदेश पारकर हे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्त साधणार असल्याची देखील चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीत निलेश राणेंनी केलेल्या मदतीची परतफेड या माध्यमातून संदेश पारकर करतील अशा चर्चा शहराच्या राजकारणात सुरू झाल्या आहेत. कणकवली शहर विकास आघाडी मध्ये सत्तेत ठाकरेंची शिवसेना देखील आहे. त्यामुळे संदेश पारकर यांनी गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त साधला तर ठाकरेंच्या शिवसेनेची काय भूमिका असणार ते देखील पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

error: Content is protected !!