‘शिवरायांची शौर्यगाथा’ ने घेतला रसिकमनाचा ठाव

बिबवणे येथे ५० लहानथोर कलाकारांच्या संचात सादरीकरण

महानाट्य सादर करण्याचा बिबवणेवासियांचा स्तुत्य उपक्रम

बिबवणे गावातील शिवप्रेमींनी शिवजयंती निमित्त आयोजित केलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रवासातील किल्ले पन्हाळगडावरून सुटका या प्रसांगावर आधारित ‘शिवरायांची शौर्यगाथा’ हे महानाट्याच्या अंगाने जाणारे लहानथोर अशा तब्बल ५० कलाकारांच्या संचात सादर झालेले हे नाटक रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन गेले. बिबवणे येथील लक्ष्मीनारायण विद्यालयाचे आजी – माजी विद्यार्थी आणि बिबवणे – पिंगुळी शिवप्रेमी यांच्यावतीने शिवजयंती निमित्त या नाटकासहित इतर कार्यक्रमांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. महानाट्य सादर करण्याचे बिबवणेवासियांनी केलेला हा प्रयत्न स्तुत्यच म्हणावा लागेल.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, स्वराज्याची प्रेरणा, त्यागाची शिकवण आणि पराक्रमाचा जाज्वल्य इतिहास बिबवणे गावातील शिवप्रेमींनी शिवजयंती निमित्त आयोजित शिवरायांची शौर्यगाथा या नाटकातून जागविला. युवा आणि बालकलाकारांचा अभिनय रसिकांच्या मनाला निश्चितच भावला.
बिबवणे लक्ष्मीनारायण विद्यालयाचे आजी – माजी विद्यार्थी आणि बिबवणे – पिंगुळी शिवप्रेमी यांच्यावतीने शिवजयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यासाठी वेशभूषा तसेच शिवरायांची शौर्यगाथा नाटक सादर करण्यात आले. या नाट्यप्रयोगाचा शुभारंभ आकाशवाणी प्रतिनिधी आणि ज्येष्ठ पत्रकार तथा रंगकर्मी नीलेश उर्फ बंड्या जोशी याच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी जि. प. सदस्या आरती पाटील, पं. स. सदस्य मंगेश प्रभू, बॅ. नाथ पै. शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक रमाकांत चव्हाण आणि निखिल ओरोसकर, सरपंच सृष्टी कुडपकर, प्राथमिक शिक्षक अमोल गोसावी, नाट्य दिग्दर्शक नागेश नाईक, भजनी बुवा दत्ता पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सुधीर लुडबे आदीसह शिवप्रेमी उपस्थित होते.
शिवरायांची शौर्यगाथा या नाटकाचे दिग्दर्शन अंकुश कुंभार आणि नागेश नाईक तसेच नृत्य दिग्दर्शक सुरज शिंदे, प्रकाशयोजना निलेश परब, अमोल गोसावी, गोट्या सावंत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कित्येक वर्षांनंतर हा ऐतिहासिक नाट्यप्रयोग युवा कलाकारांनी स्वतः पुढाकार घेत बसविला. त्यामुळे बिबवणे पंचक्रोशीत या प्रयोगाबद्दल उत्सुकता होती. बिबवणेसह पंचक्रोशीतील रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानिमित्ताने जुन्या काळी गावात सादर झालेली ऐतिहासिक नाटके आणि त्यातील भूमिकांना उजाळा मिळाला, असे वयोवृद्ध नाट्य रसिकांनी सांगितले.
उपस्थित सर्वच मान्यवरांनी नाटकांचे आणि काम करणाऱ्या सर्वच कलाकारांचे कौतुक केले. किल्ल्याचा दोन मजली सेट हे या नाटकाचे खास वैशिष्ट्य. महाराष्ट्राच्या लोकपरंपरानी नाटक सुरु होते. नृत्य, गाणी, आणि रेकॉर्डेड संवाद यांचा मेळ साधत सर्वच कलाकारांनी शिवकाळ नाट्य रसिकांसमोर उभा केला, त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, अशा शब्दात निलेश जोशी यांनी कलाकारांचे कौतुक केले. तर उमेश गाळवणकर यांनी या नाटकाचे प्रयोग सिंधुदुर्गात व्हायला हवेत असे सांगून पुढचा प्रयोग आपल्या बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये कुडाळला होणार असल्याचे जाहीर केले.
शिवरायांची शौर्यगाथा या नाटकात अगदी लहान शाळकरी मुलांपासून ते वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकानापर्यंत सर्वानीच समरसून भूमिका केली. रेकॉर्डेड संवादावर अभिनय करण्याचे कलाकारांचे कौशल्य दाद देण्याजोगे होते.
या नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती महेश अडसुळे यांनी. शिवा काशीद झाले होते केतन धुरी. बहिर्जी नाईक नीलकमल पवार हे त्यांच्या भूमिकेने आणि नृत्याने विशेष लक्षात राहिले. बाल शिवाजी आणि शंभू राजा – दीप सावंत, जिजाऊ – वेदा कुडपकर, अफजलखान – मयुरेश लाड, बडी बेगम – कोमल नाईक, बाजी प्रभू – अमोल कुडपकर, शाहिर – सचिन नाईक, कलावंतीण – नेत्रा पवार, सिद्दी जोहर – शशांक नाईक, मुगल हेर – बंड्या नाईक, सय्यद बंडा व इंग्रज – पपू वेंगुर्लेकर, गागा भट्ट – प्रसाद नाईक, रायबा – विनु आळवे, मावळा – पपू अडसुळे, यशवंत (आनंद) बिबवणेकर, वेद लोके, ओंकार वेंगुर्लेकर, अनिरुद्ध तुळसकर, मयुरेश नाईक, कडक लक्ष्मी व मावळा – भूषण सावंत, मुगल – सोमनाथ वेंगुर्लेकर, मुगल सैनिक – अभी कुडपकर, सिद्धी मसूद – यश सावंत, जीवा महाला – मंगेश सावंत, रयतेची मुले – काव्या कुडपकर, आरोही बिबवणेकर, निलांशी नाईक, रयत स्त्री – वेदिका चव्हाण, उर्वी आळवे, विधी राऊळ, साक्षी वारंग, जिया राऊळ, स्वरा चव्हाण, विधी राऊळ, साधना पाटील, रुद्रा नाईक, राशी नाईक, सानिका पाडलेकर, भवानी माता व रयत स्त्री – हर्षदा चव्हाण, लाकूड तोड्या – पार्थ लोट , गावकरी रयत – स्वनिक ओरोसकर, औक्षण करणारी स्त्री – सृष्टी कुडपकर आदी तब्बल ४४ कलाकारांचा या नाटकात समावेश होता. नाट्य प्रयोग यशस्वितेसाठी शिवप्रेमींनी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!